वर्धा,
Katwal Farming Success जिद्द व मेहनतीच्या जोरावर केळापूरच्या शेतकर्याने अवघ्या १० गुंठे क्षेत्रात काटवलाची लागवड करून त्यातून तब्बल ४० हजारांचे उत्पन्न मिळविले आहे. विशेष म्हणजे, या शेतकर्याने सेंद्रिय पद्धतीनेच काटवलाची शेती केली.
केळापूर येथील प्रयोगशील शेतकरी अशोकसिंह धुमाळे यांनी नैसर्गिक साधनांचा वापर आणि सेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब करून भाजीपाला पिकात उत्पन्नाचा नवा मार्ग शोधून काढला. अशोकसिंह यांनी मे २०२५ मध्ये अवघ्या १० गुंठे क्षेत्रात सेंद्रिय पद्धतीने ३ महिन्यांच्या काटवलाच्या रोपांची लागवड केली. जंगलातून काटवलाचे कंद व बिया जमा केले. नंतर स्वतः तयार केलेल्या बियाण्यांची आणि कंदाची लागवड केली. यादरम्यान नर व मादी झाडांचे योग्य प्रमाण राखण्यासाठी दर १० मादी झाडानंतर १ नर झाडाची शास्त्रीय पद्धतीने लागवड केली. लागवडीनंतर महिन्याभरानंतर फळधारणा सुरू झाली. त्यामधून आठवड्यातून २ वेळा तोडा करून प्रति तोडा ४ ते ५ किलो फळे मिळाली. बाजारात काटवलाला २०० ते २५० रुपये प्रती किलोचा दर मिळाला. पहिल्याच वर्षी १० गुंठ्यातून त्यांनी ४० हजारांचे निव्वळ उत्पन्न घेतले. तर दुसर्या वर्षी १ एकरात काटवलाची लागवड केली आहे.
मागील वर्षी स्वतः तयार केलेले ३ ते ३.५ किलो बियाण्यांची त्यांनी मे महिन्यात शेतात लागवड केली. ऑगस्ट २०२६ दरम्यान पहिला तोडा ८ किलो तर दुसरा तोडा १० किलो पर्यंत झाला. ऑक्टोबरपर्यंत दर आठवड्याला २ तोडे निघतील असा अंदाज अशोकसिंह धुमाळे यांचा आहे. यामध्ये २०० ते २५० रुपये प्रती किलो बाजारभाव मिळत असून सर्व विक्री थेट बाजारात केली जात आहे. या नाविन्यपूर्ण काटवल शेती प्रयोगाला कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. जीवन कतोरे, विषयतज्ज्ञ डॉ. भारती तिजारे, डॉ. निलेश वझीरे, डॉ. अंकिता अंगाईतकर, डॉ. सचिन मुळे यांनी प्रत्यक्ष भेट दिली. शिवाय कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांचे त्यांना वेळोवेळी मार्गदर्शनही लाभले.
बीज प्रक्रिया ठरली फायद्याची
शेतकरी धुमाळे हे सेंद्रिय पीक संरक्षण पद्धतीचा अवलंब करतात. त्यांनी लागवडीपूर्वी बियाण्यांवर ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया केली. कीड नियंत्रणकरिता पीक लागवाडीनंतर पिकाच्या लहान अवस्थेत दर १०-१० दिवसांनी निमार्कच्या २ फवारण्या घेतल्या. तसेच फळमाशी प्रादुर्भावापासून रक्षण करण्यासाठी फेरोमोन ट्रॅपचा यशस्वी वापर केला.