दुबई,
Lakshmanan Meyyappan sets record वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी बहुतांश विद्यार्थी शिक्षण आणि भविष्यातील करिअरची दिशा ठरवत असताना भारतीय वंशाच्या लक्ष्मणन मेय्यप्पन याने आपल्या नावावर जागतिक विक्रम नोंदवला आहे. लक्ष्मणनने १६ वर्षे आणि १४१ दिवसांचे वय असताना जगातील सर्वात तरुण पुरुष चार्टर्ड अकाउंटंट होण्याचा मान मिळवला. त्याच्या या कामगिरीची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने अधिकृत नोंद केली आहे.लक्ष्मणनचा आर्थिक आणि वित्त क्षेत्रातील प्रवास कोविड-१९च्या काळात सुरू झाला. दहावीची परीक्षा पूर्ण झाल्यानंतर त्याने या क्षेत्रातील अभ्यासाला सुरुवात केली. त्याची आई स्वतः एसीसीए उत्तीर्ण असल्याने टाळेबंदीच्या काळात त्यांनी लक्ष्मणनला लेखाशास्त्रातील मूलभूत संकल्पना समजावून सांगितल्या. त्यातून त्याची या विषयातील आवड वाढत गेली आणि वयाच्या १५व्या वर्षी त्याने एसीसीएच्या अभ्यासाला सुरुवात केली. विशेष म्हणजे, अवघ्या एका वर्षात त्याने ही पात्रता पूर्ण केली.

चार्टर्ड अकाउंटंट म्हणून विक्रम प्रस्थापित केल्यानंतरही लक्ष्मणनने शिक्षणाचा प्रवास थांबवला नाही. त्याने सीएफएची पदवीही पूर्ण केली असून सध्या वित्त विषयातील एम.एस्सी.चे उच्च शिक्षण घेत आहे. शिक्षणासोबतच तो व्यावसायिक क्षेत्रातही सक्रिय आहे. दुबईतील सेन्च्युरी फायनान्शियल या कंपनीत तो वरिष्ठ संशोधन विश्लेषक म्हणून काम करतो. गुंतवणूक, आर्थिक क्षेत्रातील संशोधन आणि विश्लेषणाशी संबंधित जबाबदाऱ्या तो या पदावर सांभाळत आहे.अभ्यास आणि नोकरीव्यतिरिक्त लक्ष्मणनला घड्याळांची निर्मिती करण्याचीही विशेष आवड आहे. मोकळ्या वेळेत तो स्वतः विविध प्रकारची घड्याळे तयार आणि डिझाइन करतो. त्यामुळे वित्त क्षेत्रातील अभ्यासासोबतच त्याच्या सर्जनशीलतेचीही झलक पाहायला मिळते.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवल्यानंतर लक्ष्मणनने या यशाबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली. हा सन्मान आपल्यासाठी महत्त्वाचा असला तरी आपण शिक्षणाकडे कधीही शर्यत म्हणून पाहिले नसल्याचे त्याने सांगितले. प्रत्यक्ष जीवनात वित्त क्षेत्र कसे कार्य करते, हे समजून घेणे आणि त्यासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करणे हेच आपले मुख्य उद्दिष्ट होते, असे त्याने स्पष्ट केले. शाळेतील पारंपरिक शिक्षणानंतर व्यावसायिक अभ्यासक्रमाचा मार्ग निवडून कमी वयात कौशल्य आणि अनुभव मिळवता येतो, हे लक्ष्मणन मेय्यप्पनच्या प्रवासातून दिसून येते. शिक्षणासोबतच प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्याच्या त्याच्या प्रयत्नामुळे कॉमर्स आणि वित्त क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी त्याची कामगिरी प्रेरणादायी ठरली आहे.