मुंबई
marathi language rule मराठी भाषा शिकण्यासाठी मुदत देऊनही मराठी न शिकणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर आता कारवाई करण्यात येणार आहे. अशा चालकांना नोटीस देऊन 30 दिवसांची मुदत दिली जाईल. या कालावधीत मराठी शिकले नाहीत तर प्रथम तीन महिन्यांसाठी लायसन्स निलंबित केले जाईल आणि त्यानंतरही नियमांचे पालन न केल्यास परमिट रद्द करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. ठाण्यात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली.
राज्यात 1989 पासूनच्या नियमानुसार रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठीत संवाद साधता येणे आवश्यक आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून अनेक चालकांना मराठी बोलता येत नसल्याने यावरून वाद निर्माण होत होते. चालकांना व्यावहारिक मराठीचे ज्ञान असावे, यासाठी सरकारने मराठी शिकवण्याची मोहीम हाती घेतली. रिक्षाचालकांच्या संघटनांनी तीन महिन्यांची मुदत मागितल्यानंतर सरकारने ती मंजूर केली होती.
या मोहिमेत रिक्षा आणि टॅक्सी चालकांना दैनंदिन व्यवहारासाठी आवश्यक असलेली मराठी शिकवण्यात आली. 16 ते 17 वाक्ये जरी चालकांना शिकता आली तरी प्रवाशांशी संवाद साधताना वाद होणार नाही, अशी भूमिका सरकारने घेतली. या उपक्रमात साहित्यिकांनीही सहभाग घेत रिक्षा चालकांचे वर्ग घेतले. जवळपास एक लाख 65 हजार रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी या उपक्रमासाठी नोंदणी केली होती. त्यापैकी सुमारे एक लाख 40 हजार चालक उत्तीर्ण झाले असून त्यांना प्रमाणपत्रे देण्यात आल्याचे सरनाईक यांनी सांगितले.मात्र, मराठीच्या परीक्षेत राज्यातील 7 हजार 750 ऑटो-टॅक्सी चालक नापास झाले आहेत. या चालकांना आणखी वेळ देऊन पुन्हा संधी द्यायची का, याबाबत सरकार विचार करणार असल्याचेही सरनाईक यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी मुदत संपल्यानंतरही मराठी शिकण्यास नकार देणाऱ्या चालकांविरोधात कठोर भूमिका घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले.
“आम्ही मुजोर रिक्षा चालकांना कायद्याच्या चौकटीत आणणार आहोत. एक मोहीम आखली जाणार आहे. जे मुजोर रिक्षा, टॅक्सी चालक मराठी शिकले नाहीत, त्यांच्यावर कारवाई करू,” असे सरनाईक म्हणाले. कारवाईपूर्वी संबंधित चालकाला 30 दिवसांची नोटीस दिली जाईल. या मुदतीत मराठी शिकला नाही तर तीन महिन्यांसाठी लायसन्स रद्द करण्यात येईल आणि त्यानंतरही मराठी शिकला नाही तर परमिट रद्द करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
दरम्यान, मराठी शिकण्यासाठी इच्छुक चालकांसाठी वर्ग सुरूच ठेवण्यात येणार असल्याचेही सरनाईक यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार हे वर्ग सुरू ठेवले जाणार असून कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातूनही चालकांना मराठी शिकवली जाणार आहे. वर्गात सहभागी न होता “आम्ही मराठी शिकणार नाही” असे म्हणणारे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित करणाऱ्यांवरही कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
यासोबतच सरनाईक यांनी प्रवाशांनाही मराठीत संवाद साधण्याचे आवाहन केले. रिक्षाचालकांकडून प्रवासी हिंदीत बोलत असल्याची तक्रार केली जाते, तर चालक मराठीत बोलण्यास तयार असल्याचेही ते सांगतात. त्यामुळे प्रवाशांनीही रिक्षा आणि टॅक्सी चालकांशी मराठीत संवाद साधावा, असे आवाहन परिवहन मंत्र्यांनी केले आहे. राज्यातील ऑटो-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा शिकण्याची अंतिम मुदत संपल्यानंतर आता सरकारच्या पुढील कारवाईकडे लक्ष लागले आहे.