कराटे प्रशिक्षण केंद्रात विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार

आरोपी कराटे प्रशिक्षक अटकाला अटक

    दिनांक :17-Aug-2026
Total Views |
अनिल कांबळे

नागपूर,
nagpur crime हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत आठ वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ३२ वर्षीय कराटे-तायक्वांदो प्रशिक्षक सागर दुधे याला अटक केली आहे. आरोपी बहादुरा फाटा परिसरात प्रशिक्षण केंद्र चालवतो. तेथे तिसरीत शिकणारी मुलगी मागील सुमारे आठ महिन्यांपासून प्रशिक्षण घेत होती.
 

nagpur crime, karate training centre assault case coach arrested for alleged sexual abuse of 8-year-old gir 
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ ऑगस्ट रोजी विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे प्रशिक्षणासाठी केंद्रात गेली होती. रात्री सुमारे ८ वाजता आरोपीने ‘स्पेशल ट्रेनिंग’ देण्याच्या बहाण्याने तिला केंद्रातील बाथरूममध्ये नेले. तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. तसेच याबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. घाबरलेल्या अवस्थेत मुलगी घरी परतली. तिची अवस्था पाहून आईने विचारपूस केली असता मुलीने रडत संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर आईने तत्काळ पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. हुडकेश्वर पोलिसांचे पथक मुलीच्या घरी पोहोचले आणि तिचा जबाब नोंदविला. पोलिसांनी आरोपीविरुद्ध लैंगिक अत्याचारासह संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपीला १८ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, आरोपीने प्रशिक्षणाच्या बहाण्याने अन्य कोणत्याही मुलीला लक्ष्य केले आहे का, याचाही पोलिस तपास करीत आहेत. या घटनेमुळे पालकांमध्ये मुलांच्या सुरक्षिततेबाबत चिंता निर्माण झाली आहे. हुडकेश्वरच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनामिका मिर्झापुरे यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे.