नवी दिल्ली,
nitin-navins-new-team-announced : भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांच्या नव्या टीमची घोषणा करण्यात आली आहे. राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राम माधव यांनीही भाजपमध्ये पुनरागमन केले असून त्यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही भाजप संघटनेत प्रवेश केला असून त्यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री तीर्थ सिंह रावत यांचीही भाजप उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ओडिशाचे बैजयंत जय पांडा यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
इन्स्टाग्रामवरील एका पोस्टमध्ये भाजप अध्यक्ष नितीन नवीन म्हणाले, "भाजपच्या राष्ट्रीय टीमच्या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा. अनुभव आणि ऊर्जेने समृद्ध असलेली ही टीम, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेला नवी चालना देईल. मला पूर्ण विश्वास आहे की, टीमचे सर्व सदस्य आपल्या कार्यकर्त्यांच्या भावनेने संघटना अधिक मजबूत करतील आणि 'विकसित भारता'चा संकल्प व राष्ट्रसेवेचे ध्येय नव्या उंचीवर नेतील."
विनोद तावडे आणि सुनील बन्सल हे राष्ट्रीय महासचिव म्हणून कायम राहतील, तर बी. एल. संतोष हे राष्ट्रीय महासचिव (संघटन) म्हणून कायम राहतील. अनिल अँटनी यांना राष्ट्रीय सचिव म्हणून कायम ठेवण्यात आले आहे, तर अनिल बलुनी राष्ट्रीय स्तरावर माध्यम संबंधांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत राहतील. १३ राष्ट्रीय उपाध्यक्षांपैकी पाच महिला आहेत, परंतु आठ राष्ट्रीय महासचिवांमध्ये स्मृती इराणी या एकमेव महिला आहेत.