पुणे
Pune Deccan Gymkhana Attack शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात गुन्हेगारीच्या घटना सातत्याने वाढत असल्याचे चित्र आहे. पुणे शहरातील डेक्कन जिमखाना परिसरात १५ ऑगस्टच्या पहाटे एका १९ वर्षीय तरुणावर प्राणघातक हल्ला झाल्याने खळबळ उडाली. ‘फ्लाइंग जिप्सी’ हॉटेलसमोर झालेल्या या हल्ल्याप्रकरणी प्रसिद्ध रीलस्टार तरुणीसह दोन तरुणी आणि एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जखमी तरुणाचे नाव अथर्व प्रमोद जगताप (वय १९, रा. आंबेगाव) आहे. शनिवारी पहाटे सव्वातीनच्या सुमारास अथर्व शिरोळे हॉटेलमधून बाहेर पडत असताना आरोपींनी त्याला अडवले. जुन्या वादाचा राग मनात ठेवून आरोपींनी अथर्वला धमकावण्यास सुरुवात केली. त्यामुळे घाबरलेल्या अथर्वने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पुन्हा हॉटेलच्या आत धाव घेतली.
मात्र, आरोपींनी त्याचा पाठलाग करत हॉटेलमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्याच्या डोक्यात शस्त्राने वार करण्यात आला. एवढ्यावरच आरोपी थांबले नाहीत. हॉटेलमधील खुर्ची अथर्वच्या दिशेने फेकण्यात आली तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात अथर्व जखमी झाला.घटनेनंतर अथर्वने डेक्कन पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन तरुणींसह तिघांना अटक केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये प्रसिद्ध रीलस्टार माधवी कुंभार (रा. हडपसर), स्नेहल सोनके (रा. पिंपळे गुरव) आणि शार्दुल ओव्हाळ (रा. हडपसर) यांचा समावेश आहे.
या तिघांशिवाय त्यांच्यासोबत असलेल्या आणखी सात ते आठ जणांविरोधातही डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुन्या वादातून झालेल्या या हल्ल्यामुळे डेक्कन जिमखाना परिसरात खळबळ उडाली असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.