राजवीर हत्याकांडात तिघांना अटक

    दिनांक :17-Aug-2026
Total Views |
अनिल कांबळे

नागपूर,

rajveer sharma murder case जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कुशीनगर परिसरात घडलेल्या राजवीर शर्मा हत्याकांडातील फरार तीन आरोपींना जरीपटका पोलिसांनी अटक केली. मध्यप्रदेशातील जबलपूर येथून पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले.
 
 

rajveer sharma murder case
माहितीनुसार, गेल्या १३ ऑगस्ट रोजी पहाटे १.३० वाजता जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कुशीनगर परिसरात एनआयटी गार्डनजवळील गल्लीत हे हत्याकांड घडले होते. जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपी राज ईलमकर, रोहीत ईलमकर आणि हनी डोंगरे यांनी संगनमत करून राजवीर शर्मा (१८) याच्यावर धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले. यावेळी त्याचा मित्र नयन सोनबरसे हा मध्यस्थी करून वाचवण्यासाठी गेला असता, आरोपींनी त्याच्यावरही ठार मारण्याच्या उद्देशाने शस्त्राने वार केले. उपचारासाठी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासणी करून राजवीर यास मृत घोषित केले. तर नयन सोनबरसे याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी मृतक तरुणाची आई शालु सोहनकुमार शर्मा यांच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता. घटनेनंतर आरोपी फरार झाले होते. तपासादरम्यान आरोपी जबलपूर येथे असल्याचे निष्पन्न झाल्यावर पोलिसांनी १५ ऑगस्ट रोजी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांची पोलिस कोठडी मंजूर केली आहे.
 
 
दहाव्या माळ्यावरून पडून मजुराचा मृत्यू
नागपूर,
जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जमना पॅलेस अपार्टमेंटमध्ये काम करताना १० व्या माळ्यावरून तोल जाऊन खाली पडल्याने एका बांधकाम मजुराचा मृत्यू झाला. सूरज प्रकाश सुरजेकर (२५, भांडेवाडी, अंतुजीनगर) असे अपघातातील मृताचे नाव आहे.
शनिवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास दयानंद पार्क जवळील जमना पॅलेस अपार्टमेंट येथे सूरज प्रकाश सुरजेकर (२५, भांडेवाडी, अंतुजीनगर) हे त्यांच्या भावासोबत बांधकाम साहित्य आणि विटा १० व्या माळ्यावर चढवण्याचे काम करत होते. काम करत असताना अचानक सुरज यांचा तोल गेला आणि ते १० व्या माळ्यावरून थेट जमिनीवर खाली पडले.त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यासोबत काम करणा-या त्यांच्या भावाने त्यांना उपचारासाठी मेयो रुग्णालयात नेले. मात्र तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी प्राप्त वैद्यकीय सूचनेवरून जरीपटका पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अक्षय ठाकरे यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.