मुंबई
riteish deshmukh अभिनेता रितेश देशमुखने माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत त्यांना विनम्र आदरांजली वाहिली आहे. रितेशने ‘एक्स’वरील आपल्या अकाऊंटवर वाजपेयी यांचा एक खास फोटो शेअर केला असून, या पोस्टमधून त्याने अटलजींच्या व्यक्तिमत्त्वासह देशाच्या राजकारणातील त्यांच्या योगदानाचा गौरव केला आहे. वाजपेयी हे कुशल राजकारणी, कवी आणि जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे लोकनेते होते, असे रितेशने म्हटले आहे.
रितेशने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, ‘श्री अटलबिहारी वाजपेयी हे भारताने घडवलेल्या सर्वोत्तम नेत्यांपैकी एक होते. एक मुत्सद्दी राजकारणी, कवी आणि पक्षांच्या सीमांच्या पलीकडे जाऊन प्रेम आणि आदर मिळवणारे लोकनेते.. अशा या महान व्यक्तिमत्त्वाला त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त मी विनम्र आदरांजली अर्पण करतो.’ रितेशने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याचे वडील आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे अटल बिहारी वाजपेयी यांच्यासोबत हस्तांदोलन करताना दिसत आहेत.
अटल बिहारी वाजपेयी यांनी तीन वेळा भारताचे पंतप्रधान म्हणून देशाचे नेतृत्व केले. भारतीय राजकारणातील प्रभावी आणि लोकप्रिय व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. भाजपला राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाचे स्थान मिळवून देण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची होती. प्रभावी वक्तृत्व, दमदार भाषणे आणि कवितेची आवड यामुळे त्यांनी राजकारणाच्या पलीकडेही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.वाजपेयी यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे राजकीय विरोधकांशी संवाद साधण्याची त्यांची भूमिका. त्यामुळे वेगवेगळ्या विचारसरणीच्या नेत्यांमध्येही त्यांच्याविषयी आदराची भावना होती. पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन सर्वच राजकीय पक्षांमध्ये आदर मिळवणाऱ्या नेत्यांमध्ये अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव अग्रस्थानी घेतले जाते.रितेश देशमुख स्वतः राजकीय कुटुंबातून आलेला असून त्याचे वडील विलासराव देशमुख महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते. त्यामुळे देशमुख कुटुंबाचे राजकारणातील अनेक दिग्गज नेत्यांशी जवळचे संबंध राहिले आहेत. रितेशच्या या पोस्टमधून अटल बिहारी वाजपेयी यांची केवळ राजकारणी म्हणून नव्हे, तर कवी आणि सर्वसामान्यांशी नाते जोडणारे लोकनेते म्हणूनही आठवण कायम राहील, अशी भावना व्यक्त झाली आहे.