वॉशिंग्टन,
Secret communication between the US and Iran इराणसोबतच्या चर्चेदरम्यान तेहरानची नेमकी भूमिका जाणून घेण्यासाठी अमेरिकेने पडद्यामागून एक महत्त्वाची राजनैतिक मोहीम राबवली होती. मे महिन्याच्या मध्यात सुरू झालेल्या थेट वाटाघाटींमध्ये इराणचे प्रतिनिधी खरोखरच देशाच्या सर्वोच्च लष्करी नेतृत्वाच्या संमतीने चर्चा करत आहेत का, याची खात्री करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सशी (IRGC) गुप्त संपर्क साधल्याचे समोर आले आहे.या संवेदनशील मोहिमेसाठी इराकच्या कुर्दिस्तान प्रदेशाचे अध्यक्ष नेचिरवान बरझानी यांची मदत घेण्यात आली. अमेरिका तसेच इराणमधील IRGCच्या अधिकाऱ्यांशी त्यांचे संबंध असल्याने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली. इराण-इराक युद्धाच्या काळात बरझानी यांनी इराणमध्ये आश्रय घेतला होता. त्यानंतर त्यांनी तेहरान विद्यापीठात शिक्षण पूर्ण केले. त्यांना फारसी भाषेचेही उत्तम ज्ञान असून इराणच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांचे वैयक्तिक संबंध असल्याचे अमेरिकी माध्यमांच्या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

अमेरिकेची ही गुप्त मोहीम १० मेच्या आसपास सुरू झाल्याचे सांगितले जाते. तत्कालीन राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गबार्ड यांनी बरझानी यांच्याशी संपर्क साधून IRGCचे कमांडर जनरल अहमद वाहिदी यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत मागितली. हा संपर्क राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. व्हान्स यांच्या थेट मंजुरीनंतर करण्यात आल्याचेही त्यांना सांगण्यात आले.अमेरिकेला विशेषतः हे जाणून घ्यायचे होते की, इराणचे संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ आणि परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या वाटाघाटींना IRGCच्या सर्वोच्च नेतृत्वाचा पाठिंबा आहे का. अमेरिकेला वाहिदी यांच्याशी थेट संपर्क साधणे शक्य नसल्याने बरझानी हे या संपूर्ण प्रक्रियेतील महत्त्वाचे मध्यस्थ ठरले.
अमेरिकेचा संदेश मिळाल्यानंतर बरझानी यांनी आपल्या इराणी संपर्कांमार्फत वाहिदी यांच्याशी संवाद साधण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर १४ मे रोजी IRGCच्या एका अधिकाऱ्याने एर्बिलमधील बरझानी यांच्या कार्यालयात त्यांची भेट घेतली आणि सुरक्षित संवादासाठी एन्क्रिप्टेड फोन उपलब्ध करून दिला. या माध्यमातून बरझानी यांनी हमद वाहिदी यांच्याशी संपर्क साधून इराणी वाटाघाटीकारांच्या भूमिकेला त्यांचा पाठिंबा आहे का, याबाबत थेट विचारणा केली. वाहिदी यांनी सकारात्मक उत्तर देत वाटाघाटीकारांना पूर्ण पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. संवादाच्या माध्यमातून संकट सोडवणे हीच IRGCची अधिकृत भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. हा संदेश बरझानी यांनी तातडीने तुलसी गबार्ड यांच्यापर्यंत पोहोचवला आणि त्यानंतर तो व्हाईट हाऊसपर्यंत पोहोचला.
इराणच्या लष्करी नेतृत्वाकडून मिळालेल्या या पुष्टीमुळे अमेरिकेने पुढील राजनैतिक पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला. बरझानी यांच्या माध्यमातून एर्बिलमध्ये अमेरिकी आणि इराणी वरिष्ठ वाटाघाटीकारांची गुप्त बैठक आयोजित करण्याचा प्रस्ताव देण्यात आला. मात्र, इराणने सुरक्षेच्या कारणांचा हवाला देत या चर्चेत सहभागी होण्यास नकार दिल्याने ही बैठक प्रत्यक्षात होऊ शकली नाही.या संपूर्ण घडामोडीमुळे अमेरिका आणि इराणमधील वाटाघाटी किती गुंतागुंतीच्या होत्या, हे स्पष्ट होते. विशेषतः इराणमध्ये अंतिम निर्णय घेण्याची वास्तविक सत्ता नेमकी कोणाकडे आहे, याबाबत वॉशिंग्टनसमोर असलेले प्रश्न या गुप्त संपर्कातून अधोरेखित झाले. मे महिन्यात अमेरिका आणि इराण यांच्यात सामंजस्य करारावर पोहोचण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, करारातील भाषा आणि शब्दरचनेवर मतभेद निर्माण झाल्याने ही प्रक्रिया पुढे जाऊ शकली नाही. सध्या पाकिस्तान आणि कतार हे दोन्ही देशांदरम्यान मध्यस्थ म्हणून संदेशांची देवाणघेवाण करत आहेत. मात्र, अद्याप या प्रयत्नांमधून कोणतीही ठोस प्रगती झालेली नाही. भविष्यात अमेरिका आणि इराणमध्ये पुन्हा चर्चा सुरू झाल्यास, प्रत्यक्ष निर्णय घेणाऱ्या इराणी नेतृत्वाशीच संवाद होत आहे याची खात्री करणे हे वॉशिंग्टनपुढील मोठे आव्हान राहणार आहे. त्यामुळे नेचिरवान बरझानी यांच्यासारख्या विश्वासार्ह मध्यस्थांची भूमिका पुढील राजनैतिक प्रयत्नांमध्येही महत्त्वाची ठरू शकते.