पुणे
Sinhagad Fort Clash महाराष्ट्राच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व असलेला आणि पुण्याचे वैभव म्हणून ओळखला जाणारा सिंहगड किल्ला स्वातंत्र्यदिनी मात्र धक्कादायक प्रकारामुळे चर्चेत आला. १५ ऑगस्ट रोजी किल्ल्यावर भ्रमंतीसाठी मोठ्या संख्येने आलेल्या पर्यटकांना असुरक्षित वातावरणाचा सामना करावा लागला. गर्दी व्यवस्थापनाचा पूर्णपणे फज्जा उडाल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.
स्वातंत्र्यदिनी सिंहगडावर दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या राड्यात मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला असून, परस्परांचे कपडे फाडण्यापासून ते एकमेकांवर दगडफेक करण्यापर्यंत प्रकार घडल्याची माहिती आहे. भरपावसात झालेल्या या हाणामारीमुळे किल्ल्यावर फिरण्यासाठी आलेले पर्यटक धास्तावले. विशेषतः महिला आणि मुलींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या हाणामारीत काही महिला जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
याच गर्दीचा काही समाजकंटकांनी गैरफायदा घेतल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तरुण महिला आणि मुलींना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करून त्यांचा छळ करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ऐतिहासिक सिंहगड किल्ल्यावर पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या या प्रकारामुळे संताप व्यक्त होत आहे.धक्कादायक बाब म्हणजे किल्ल्यावर हाणामारी आणि गोंधळ सुरू असताना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस किंवा सुरक्षारक्षकांची पुरेशी उपस्थिती नसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दुसरीकडे, काही स्थानिक मंडळाचे कार्यकर्ते गुटखा खाणाऱ्या व्यक्तींना १०० उठा-बशांची शिक्षा देण्यात व्यस्त असल्याचेही सांगण्यात आले. गर्दी नियंत्रण आणि पर्यटकांची सुरक्षा यांना प्रथम प्राधान्य देणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात त्याकडे दुर्लक्ष का झाले, असा सवाल प्रत्यक्षदर्शींनी उपस्थित केला आहे.
सिंहगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराज आणि महान योद्धे तानाजी मालुसरे यांच्या शौर्यगाथेशी जोडलेला ऐतिहासिक वारसा आहे. अशा ऐतिहासिक स्थळी महिला आणि मुलींशी छेडछाडीसारखे प्रकार घडणे ही गंभीर बाब असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पावसाळ्यात सिंहगडाचे सौंदर्य अधिक खुलून येत असल्याने दरवर्षी या काळात किल्ल्यावर पर्यटकांची मोठी गर्दी होते. मात्र, यंदा स्वातंत्र्यदिनी याच गर्दीमध्ये हिंसाचार आणि सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, भरपावसात सिंहगडावर झालेल्या हाणामारीचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. या हाणामारीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, हवेली पोलिसांनी संबंधित घटनेची दखल घेतली आहे. भविष्यात किल्ल्यावर एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी वनखाते आणि पोलीस प्रशासनाकडून पर्यटकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना केल्या जाणार का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.