लखीसराय,
Stampede at Ashokdham Temple बिहारमधील लखीसराय येथील प्रसिद्ध अशोकधाम मंदिरात श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी पहाटे भाविकांची मोठी गर्दी अचानक अनियंत्रित झाल्याने भीषण चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत सात महिला भाविकांचा मृत्यू झाला असून २४ जणी जखमी झाल्या आहेत. जखमींपैकी १९ जणींवर सदर रुग्णालयात, तर पाच जणींवर शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये लखीसराय, मुंगेर आणि पाटणा जिल्ह्यातील महिलांचा समावेश आहे.अशोकधाम येथील श्री इंद्रदमनेश्वर महादेव मंदिरात श्रावणातील तिसऱ्या सोमवारी दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली होती. मंदिराच्या दक्षिण दरवाजापासून अशोकधाम रेल्वे स्थानकाच्या मार्गापर्यंत भाविकांची मोठी रांग लागली होती. याचदरम्यान मोकामा-बैद्यनाथधाम मेळा विशेष रेल्वे सकाळी ५:४२ वाजता अशोकधाम स्थानकावर दाखल झाली. या रेल्वेतून शेकडो भाविक उतरले आणि ‘बोल बम’चा जयघोष करत मंदिराच्या दिशेने निघाले. आधीच गर्दीने भरलेल्या मार्गावर अचानक मोठ्या संख्येने भाविक आल्याने परिस्थिती आणखी तणावपूर्ण झाली.
प्रत्यक्षदर्शींनुसार, दृष्टी किरण परिसरातील गर्दीच्या दबावामुळे एक जीर्ण विजेचा खांब कोसळला. या खांबाला जोडलेल्या केबलमधून ठिणग्या पडू लागल्याने भाविकांमध्ये विजेचा धक्का लागल्याची अफवा पसरली. त्यामुळे घाबरलेल्या लोकांनी सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी अचानक धाव घेतली आणि त्यातून चेंगराचेंगरी झाली. या गोंधळात अनेक महिला गर्दीत अडकल्या. सात महिला भाविकांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला.घटनेनंतर परिसरात मोठा गोंधळ उडाला. पोलिस आणि प्रशासनाने तातडीने बचावकार्य सुरू केले. जखमींना रुग्णवाहिका तसेच उपलब्ध वाहनांमधून सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील वैद्यकीय पथकाला सतर्क करून जखमींवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी शैलेंद्र कुमार प्रशासकीय अधिकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर त्यांनी सदर रुग्णालयात जाऊन जखमींच्या उपचारांची माहिती घेतली. मुंगेरचे विभागीय आयुक्त प्रेम सिंग मीना आणि डीआयजी राकेश कुमार यांनीही घटनास्थळ तसेच रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. आमदार रामानंद मंडल यांनीही घटनास्थळी पोहोचून परिस्थितीची पाहणी केली.
चेंगराचेंगरीदरम्यान जमावाच्या प्रचंड दबावामुळे घटनास्थळावरील कमकुवत बॅरिकेड्सचे नुकसान झाले. तेथे तैनात असलेले दोन एसएसबी जवानही या गोंधळात थोडक्यात बचावले. दुर्घटनेनंतर मंदिराच्या आत आणि बाहेर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे.या दुर्घटनेत मनमाला देवी (४४), निरंजन कुमार यांची पत्नी, बरहिया वॉर्ड १२, लखीसराय; रिंकू देवी (५०), नीरज यादव यांची पत्नी, बौतोला फर्ड, मुंगेर; हेमलता देवी (५५), सुरेंद्र यादव यांच्या पत्नी, प्रतापपूर, हलसी, लखीसराय; ललिता देवी (५०), गोरेलाल यादव यांच्या पत्नी, प्रतापपूर, हलसी, लखीसराय; सविता कुमारी (३५), रणवीर यादव यांच्या पत्नी, प्रतापपूर, हलसी, लखीसराय; सरोज देवी (६५), जनार्दन सिंग यांच्या पत्नी, बकनवा भदौर, पाटणा आणि सावित्री देवी (४९), मोहन यादव यांच्या पत्नी, चनानिया, लखीसराय यांचा मृत्यू झाला.
मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी या दुर्घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले असून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. त्यांनी ही घटना अत्यंत दुःखद आणि हृदयद्रावक असल्याचे म्हटले. जखमींना योग्य आणि तातडीचे उपचार मिळावेत, यासाठी प्रशासनाला आवश्यक सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. अशोकधाम मंदिर श्री इंद्रदमनेश्वर महादेव मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. मंदिरातील जमिनीतून खोदलेले मोठे शिवलिंग हे येथील प्रमुख धार्मिक आकर्षण मानले जाते. श्रावण महिन्यात, विशेषतः सोमवारी, येथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. मात्र याच धार्मिक उत्साहाला सोमवारी झालेल्या चेंगराचेंगरीमुळे अचानक दुःखाची किनार लाभली.