सनी म्हणाला ‘पान मसाला नाही’; जुना VIDEO व्हायरल

नेटकऱ्यांचा सवाल, ‘थोडा तरी गृहपाठ करा’

    दिनांक :17-Aug-2026
Total Views |
मुंबई
sunny deol इंटरनेटच्या जगात एकदा समोर आलेली गोष्ट पूर्णपणे नाहीशी होत नाही, याचा प्रत्यय अभिनेता सनी देओलच्या बाबतीत पुन्हा एकदा आला आहे. कोट्यवधी रुपयांसाठी पान मसाला किंवा विमल इलायचीसारख्या ब्रँड्सच्या जाहिराती करण्याच्या बाजूने आपण नसल्याचे सनी देओलने नुकतेच स्पष्ट केले होते. मात्र, त्याचे हे वक्तव्य समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याचा एक जुना जाहिरातीचा व्हिडीओ शोधून काढत त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
 

sunny deol says he would never promote pan masala, old ad video sparks controversy 
शाहरुख खान, अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांना विमल पान मसाला किंवा इलायचीच्या जाहिरातीप्रकरणी एफडीएकडून नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणावरून तिघांवर टीका होत असतानाच सनी देओलने एका पॉडकास्टमध्ये आपली भूमिका मांडली. कोट्यवधी रुपये मिळाले तरी आपण कधीच पान मसाल्याची जाहिरात करणार नाही, असे त्याने म्हटले. त्याचे हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी सनी देओलचा जुना जाहिरातीचा व्हिडीओ समोर आणला.
‘एक्स’वरील एका युजरने सनी देओलच्या या जुन्या जाहिरातीचा व्हिडीओ शेअर केला आहे. या जाहिरातीत सनी देओलसोबत रवी किशन आणि विजय राज हे कलाकारही दिसत आहेत. जाहिरातीच्या सुरुवातीला सनी देओल दोन तरुणींसोबत एका स्टॉलवर पोहोचतो आणि दुकानदाराकडे सर्वांत उत्तम मीठा पान देण्यास सांगतो. दुकानदाराची भूमिका साकारणारा रवी किशन त्याला मीठा पानाचे पाकीट देतो. या जाहिरातीचा व्हिडीओ समोर आल्यानंतर सनी देओलच्या सध्याच्या वक्तव्यावरून नेटकऱ्यांनी त्याला लक्ष्य केले आहे.
या जुन्या व्हिडीओवर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. एका युजरने “वाह रे भाऊ” अशी प्रतिक्रिया दिली, तर दुसऱ्या युजरने “थोडा तरी गृहपाठ करा” असे म्हटले आहे. “इतर सेलिब्रिटी तर वेलची विकत आहेत, याने तर थेट पान मसाला विकला आहे,” अशी टीकाही एका नेटकऱ्याने केली आहे. त्यामुळे पान मसाल्याच्या जाहिरातींवर सनी देओलने केलेल्या वक्तव्याची आणि त्याच्या जुन्या जाहिरातीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.