नवा इस्लामिक त्रिकोण!

    दिनांक :17-Aug-2026
Total Views |
दिल्ली दिनांक,
रवींद्र दाणी,

islamic-triangle : उत्तर अटलांटिक महासागरात ‘बर्मुडा त्रिकोण’ नावाचा एक भाग अतिशय धोकादायक म्हणून ओळखला जातो. असाच एक त्रिकोण भारताच्या शेजाऱ्याने तयार केला आहे- इस्लामिक त्रिकोण ! साऱ्या जगातील मुस्लिमांसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या मक्का शहरात, मुस्लिमांसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या शुक्रवारी या त्रिकोणाची घोषणा करण्यात आली. पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि तुर्कस्थान म्हणजे टर्की असा हा एक नवा त्रिकोण तयार झाला आहे.
 
AI
 
नाटोची नक्कल : दुसऱ्या महायुद्धानंतर नाटो म्हणजे नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन नावाची संघटना स्थापन करण्यात आली. अमेरिकेच्या पुढाकाराने स्थापन करण्यात आलेल्या नाटोचे मुख्य उद्दिष्ट सोवियत युनियनवर वचक ठेवणे हे होते. नाटोच्या घटनेत कलम ५ हे सर्वांत महत्त्वाचे मानले जाते. नाटो संघटनेतील कोणत्याही एका देशावर हल्ला झाल्यास तो संपूर्ण नाटोवर हल्ला समजण्यात यावा आणि अन्य नाटो देशांनी आपल्या सदस्य देशासाठी युद्धात उतरावे असे या कलमात म्हटले आहे. याची हुबेहूब नक्कल या तीन देशांनी स्थापन केलेल्या करारात करण्यात आली आहे.
 
 
महत्त्वाचे देश : नव्या संघटनेत सामील असलेले पाकिस्तान, सौदी अरेबिया व टर्की हे तिन्ही देश महत्त्वाचे मानले जातात. पाकिस्तान हा अण्वस्त्रसंपन्न असेलला एकमेव मुस्लिम देश आहे. पाकिस्तानचे लष्कर, वायुदळ प्रभावी मानले जाते. वर्षभरापासून जागतिक राजकारणात पाकिस्तानचे ‘चलन’ चालू लागले आहे. एक बहिष्कृत देश ही त्याची प्रतिमा आता बदलली आहे. चीन व अमेरिका दोन्ही देशांचा आशीर्वाद लाभलेला हा एकमेव देश मानला जातो. पाकिस्तानच्या पुढाकाराने ही नवी संघटना स्थापन करण्यात आली असल्याचे म्हटले जाते.
 
सौदी अरेबिया हा दोन कारणांसाठी महत्त्वाचा मानला जातो. एक म्हणजे त्याला इस्लामची राजधानी मानली जाते. जगातील ५४ इस्लामिक देशात सौदी अरेबियाला मक्का-मदिनामुळे एक प्रतिष्ठा आहे. सौदी अरेबियाचे दुसरे महत्त्व म्हणजे हा एक संपन्न देश मानला जातो. या देशात असलेल्या पेट्रोलियम पदार्थांमुळे त्याची संपन्नता वाढली आहे. आता जगातील सर्वांत उत्तुंग इमारत ‘जेद्दा टॉवर‘ या देशात बांधली जात आहे. एक आर्थिक शक्ती व एक धार्मिक शक्ती या दोन कारणांसाठी सौदी अरेबियाचा या संघटनेतील सहभाग महत्त्वाचा मानला जातो. आणि यातील तिसरा देश म्हणजे टर्की!
 
 
नाटोचा घटक : टर्कीची एक महत्त्वाची ओळख म्हणजे हा देश नाटोचा सदस्य आहे. जगात टर्कीचे लष्कर ९ व्या क्रमांकाचे आहे तर नाटो संघटनेत टर्कीचे सैनिकी सामर्थ्य दुसऱ्या क्रमांकाचे आहे. १४५ देशांच्या ग्लोबल फायर पॉवर इंडेक्समध्ये टर्की ९ व्या क्रमांकावर आहे. अमेरिकेने आपली अद्ययावत अशी एफ-१६ जातीची विमाने टर्कीला दिली आहेत. या देशाने ‘ड्रोन’ उत्पादनात फार मोठी प्रगती केली असल्याचे म्हटले जाते.
नव्याने स्थापन झालेल्या या संघटनेची महत्त्वाची बाब म्हणजे तिन्ही देश सुन्नी मुस्लिम आहेत. यात इजिप्तही सामील होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसे झाल्यास या संघटनेचा विस्तार अधिक झालेला असेल.
 
भारतासाठी... : पाकिस्तानच्या पुढाकाराने स्थापन झालेली ही युती भारतासाठी चिंताजनक ठरणार आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या काळात टर्कीने पाकिस्तानला उघडपणे मदत केली होती. लष्करी तंत्रज्ञान व तंत्रज्ञ या दोन्ही बाबी टर्कीने पाकिस्तानला पुरविल्या होत्या. भारताने यावर विरोध नोंदविला होता. पण, भारताचा विरोध झुगारून टर्कीने पाकिस्तानला मदत केली होती. आता तर या देशांनी परस्परांना लष्करी सहकार्य करण्याचा करारच केला आहे. म्हणजे भविष्यात भारत-पाकिस्तान संघर्ष झडल्यास पाकिस्तानला मदत करणे टर्की व सौदी अरेबियावर बंधनकारक राहणार आहे. टर्कीने सोनगार व टीबी-२ जातीचे ड्राेन तयार केले असून ते फार प्रभावी असल्याचे मानले जाते. आता हे सारे पाकिस्तानला मिळणार आहेत.
 
पाकला मोठा फायदा : नव्या लष्करी युतीमुळे पाकिस्तानला होणारा मोठा फायदा म्हणजे पाकिस्तानची पोच आता थेट भूमध्य सागरापर्यंत जाणार आहे. पाकिस्तान-इराण यांचे संबंध अतिशय चांगले आहेत. म्हणजे पाकिस्तानला लागून असलेला इराण, इराणला लागून असलेला टर्की आणि टर्कीचा समुद्र किनारा हे भौगोलिक समीकरण पाकिस्तानसाठी फार मोलाचे ठरणार आहे.
 
अमेरिकेला धक्का? : अमेरिकेला न विचारता या तीन देशांनी एकत्र येऊन तयार केलेली ही लष्करी युती अमेरिकेसाठी एक मोठा धक्का मानला जातो. विशेष म्हणजे हे तिन्ही देश अमेरिकेचे समर्थक मानले जातात आणि तरीही त्यांनी अमेरिकेला विश्वासात न घेता या लष्करी युतीची घोषणा केली. हा एकप्रकारे अमेरिकेवरील अविश्वास मानला जातो. आजवर हे देश आपल्या सुरक्षेसाठी अमेरिकेवर अवलंबून होते. पण, त्यांना आता अमेरिकेकडून मिळणारी सुरक्षा अपुरी वाटू लागली आहे. रा ष्ट्रपती ट्रम्प यांनी नाटो देशांना अनेकदा झिडकारले आहे. त्याचाच परिणाम म्हणजे नाटो सदस्य असलेला टर्की या नव्या लष्करी युतीत सामील झाला आहे. तीच अवस्था सौदी अरेबियाची आहे. अमेरिकेचे लष्करी व हवाई तळ सौदी अरेबियात असताना, इराणच्या हल्ल्यापासून त्याचे सरंक्षण करण्यात अमेरिका अपयशी ठरली आहे. अमेरिकेपेक्षा पाकिस्तान अधिक भरवशाचा असा विचार सौदी अरेबियाने केलेला दिसतो. इराणच्या हल्ल्यांपासून आपल्याला अमेरिका वाचवू शकत नाही, पाकिस्तान वाचवू शकतो या निष्कर्षावर सौदी अरेबिया आला आहे. त्यातून या नव्या लष्करी युतीचा जन्म झाला.
 
इजिप्त सामील होणार? : नव्या लष्करी युतीत इजिप्त सामील होण्याची शक्यता असल्याचे मानले जाते. तसे झाल्यास या लष्करी युतीचा आकार व प्रभाव वाढलेला आहे. ही युती स्थिर झाल्यास आणखी काही मुस्लिम देश यात सहभागी होण्याची शक्यता आहे. हे झाल्यास एक मुस्लिम नाटो अस्तित्वात आलेले असेल. आणि याचा मुख्य रोख भारताच्या विरोधात असेल. भारत-इराण यांचे संबंध चांगले असले तरी सध्या सुरू असलेल्या हाेर्मुझ सामुद्रधुनी प्रकरणात इराणने भारतीय तेलवाहू जहाजांना लक्ष्य बनविल्याच्या काही घटना घडल्या आहेत. भारताचे अनेक इस्लामिक देशांशी चांगले संबंध असले तरी जेव्हा या देशांसमोर भारत की पाकिस्तान अशी स्थिती तयार होते, तेव्हा या देशांनी नेहमीच पाकिस्तानला साथ दिली आहे.
 
जागतिक धोका? : तीन देशांनी स्थापन केलेली ही लष्करी युती आज फार महत्त्वाची वाटत नसली तरी या युतीचा विस्तार झाल्यास व ती बळकट झाल्यास साऱ्या जगाला वेठीस धरण्याची क्षमता-ताकद या युतीत येऊ शकते. याची प्रामुख्याने तीन कारणे आहेत. यात पाकिस्तान नावाचा अण्वस्त्रसंपन्न देश आहे. यात जगातील ऊर्जा संसाधने आहेत आणि महत्त्वाचे असे जलमार्ग आहेत. इराणने होर्मुझ नावाची एक सामुद्रधुनी रोखून अमेरिकेला कसे कोंडीत पकडलेे आहे हे जगासमोर आहे. उद्या हाच प्रयोग जगातील वेगवेगळ्या देशांसाठीही होऊ शकतो.
 
तीन देशांचा हा नवा इस्लामिक त्रिकोण जगाच्या स्थिरतेला सुरुंग लावू शकतो. पण, याची दखल अमेरिका घेईल काय? नवे अत्याधुनिक विमान, व्हाईट हाऊसमध्ये नवी ‘बॉल रुम‘ आणि वेगवेगळे सौदे यातच रममाण झालेले राष्ट्रपती ट्रम्प यांचे पाय जमिनीला लागले तरच ते याचा विचार करतील.