मुंबई
tukaram mundhe biopic राज्यात सध्या ‘फायरब्रँड’ आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची जोरदार चर्चा सुरू आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती झाल्यापासून त्यांनी कारवायांचा धडाका लावला आहे. भेसळयुक्त दूध आणि पनीर, रेस्टॉरंट्स, प्रतिबंधित गुटखा तसेच नियमांचे पालन न करणाऱ्या ब्लिंकिटविरोधातील एफडीएच्या कारवायांमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. कर्तव्यनिष्ठ आणि आदर्श अधिकारी अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली असतानाच आता त्यांच्या आयुष्यावर चित्रपट येणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. विशेष म्हणजे या बायोपिकमध्ये अभिनेता अक्षय कुमार मुख्य भूमिका साकारणार असल्याचा दावाही केला जात आहे.
अक्षय कुमारने यापूर्वी अनेक बायोपिक्स आणि सत्य घटनांवर आधारित चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. ‘पॅडमॅन’, ‘मिशन रानीगंज’, ‘केसरी: चाप्टर 2’, ‘गोल्ड’, ‘एअरलिफ्ट’ आणि ‘रुस्तम’ यांसारख्या चित्रपटांमधून त्याने विविध व्यक्तिरेखा साकारल्या. त्यामुळे तुकाराम मुंढे यांच्या संघर्षमय कारकिर्दीवर आधारित चित्रपटात अक्षय कुमार भूमिका करणार असल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
तुकाराम मुंढे यांचा संघर्ष, विविध ठिकाणी झालेल्या बदल्या आणि त्यांनी केलेल्या कारवाया मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे या चर्चेतून दिसून येत आहे. मात्र, या बायोपिकबाबत सध्या कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्ट आणि त्यामध्ये वापरण्यात आलेला अक्षय कुमारचा फोटो नेटकऱ्यांनी एडिट करून तयार केल्याचे समोर आले आहे. या प्रकल्पाबाबत अक्षय कुमार किंवा कोणत्याही निर्माते-दिग्दर्शकाकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
तुकाराम मुंढे हे प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून लोकप्रिय आहेत. आजवर ज्या-ज्या ठिकाणी त्यांची बदली झाली, तिथे त्यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता कर्तव्य बजावल्याची त्यांची प्रतिमा आहे. प्रशासकीय कामामुळे अनेकदा त्यांच्या बदल्या झाल्या, मात्र त्यांनी आपले काम आणि निष्ठा कायम ठेवली. अन्न आणि औषध प्रशासन विभागातही त्यांच्या कारवायांची चर्चा सुरू आहे.
खऱ्या आयुष्यातील ‘हिरो’ म्हणून तरुणवर्गाकडूनही तुकाराम मुंढे यांचे कौतुक केले जाते. त्यामुळे त्यांच्या आयुष्यावर भविष्यात चित्रपटाची घोषणा झाली, तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नसेल. मात्र, सध्या अक्षय कुमार त्यांच्या बायोपिकमध्ये भूमिका साकारणार असल्याची सोशल मीडियावरील चर्चा ही अधिकृत नसून, व्हायरल पोस्टवर आधारित असल्याचे स्पष्ट झाले आहे.