भोपाळ,
Twisha's death a murder or a suicide मध्य प्रदेशातील भोपाळ येथील मॉडेल-अभिनेत्री ट्विशा शर्मा यांच्या मृत्यू प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने म्हणजेच सीबीआयने ६३६ पानी आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रातील तपासाच्या निष्कर्षांनुसार ट्विशाच्या मृत्यूबाबत करण्यात आलेल्या दुसऱ्या शवविच्छेदनातही आत्महत्येचीच पुष्टी झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कुटुंबीयांनी व्यक्त केलेल्या हत्येच्या संशयाला तपासाच्या निष्कर्षांमुळे वेगळे वळण मिळाले आहे.ट्विशाच्या कुटुंबीयांनी सुरुवातीच्या शवविच्छेदन अहवालावर आक्षेप घेतला होता. या अहवालातील काही तथ्यांमध्ये फेरफार करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता. आरोपी सासू गिरिबाला यांच्या प्रभावामुळे शवविच्छेदनापूर्वी पुराव्यांमध्ये बदल करण्यात आल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला होता. त्यामुळे त्यांनी ट्विशाच्या मृत्यूमागे हत्या असल्याची शक्यता मांडली होती.

कुटुंबीयांच्या आक्षेपानंतर जबलपूर उच्च न्यायालयाच्या आदेशाने दिल्लीतील एम्सचे वैद्यकीय पथक भोपाळमध्ये दाखल झाले. त्यानंतर ट्विशाचे दुसरे शवविच्छेदन करण्यात आले. मात्र, या दुसऱ्या अहवालातही आत्महत्येचीच पुष्टी झाल्याचे सीबीआयने आरोपपत्रात नमूद केले आहे.दरम्यान, या प्रकरणात सीबीआयने समर्थ सिंग आणि गिरिबाला सिंग यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. दोघांवर कथित हुंडाबळी प्रकरणाशी संबंधित आरोप आहेत. गिरिबाला सिंग या निवृत्त जिल्हा न्यायाधीश आहेत, तर समर्थ सिंग त्यांचा मुलगा आहे. यापूर्वी विशेष सीबीआय न्यायालयाने दोन्ही आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत ११ ऑगस्टपर्यंत वाढ केली होती. नियमित दंडाधिकारी रजेवर असल्याने सुनावणी कर्तव्यस्थ दंडाधिकाऱ्यांसमोर झाली. समर्थ सिंग आणि गिरिबाला सिंग हे दोघेही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर झाले होते.
ट्विशा शर्मा यांच्या कुटुंबीयांच्या वतीने बाजू मांडणाऱ्या वकील शुभांगी दीक्षित यांनी आयएएनएसला दिलेल्या माहितीनुसार, तपास अद्याप सुरू असल्याचा सीबीआयचा युक्तिवाद न्यायालयासमोर करण्यात आला. त्यानंतर न्यायालयाने आरोपींची न्यायालयीन कोठडी वाढवण्याची मागणी मंजूर केली.सुनावणीदरम्यान आरोपींनी आवाजाचे नमुने देण्यास सहकार्य केले नसल्याच्या सीबीआयच्या आरोपांनाही आव्हान दिले. आवाजाचे नमुने घेताना तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी योग्य पद्धतीने वर्तन केले नसल्याचा दावा बचाव पक्षाने केला असून, याबाबत न्यायालयात आक्षेप नोंदवण्यात आला. या प्रकरणातील ६३६ पानी आरोपपत्र आणि दुसऱ्या शवविच्छेदन अहवालातील निष्कर्षामुळे ट्विशा शर्मा यांच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासाला महत्त्वाचे वळण मिळाले आहे. मात्र, आरोपींवरील इतर आरोप आणि त्यासंदर्भातील न्यायालयीन प्रक्रिया अद्याप सुरू असून, या प्रकरणाचा अंतिम निर्णय न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होणार आहे.