‘वहिनी आय लव्ह यू’च्या हाकेने सुनेत्रा पवार भावुक

    दिनांक :17-Aug-2026
Total Views |
पुणे
sunetra pawar पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ‘दादा उद्योगनी’ अ‍ॅपचे लोकार्पण करण्यात आले. मात्र, या कार्यक्रमात अ‍ॅपपेक्षा अधिक चर्चा रंगली ती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि कार्यकर्त्यांमधील भावनिक संवादाची. भाषणादरम्यान सुनेत्रा पवार चांगल्याच भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी यावेळी अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या भावनिक भाषणामुळे कार्यकर्तेही भावुक झाले.
 

vahini i love you: sunetra pawar gets emotional remembering ajit pawar 
भाषण करताना सुनेत्रा पवार म्हणाल्या, “माझ्या, तुमच्या आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात जी पोकळी निर्माण झालेली आहे, ती कोणीच कधीच भरून काढू शकत नाही. एका क्षणामध्ये आपण सर्वच पोरके झालो. पण जेव्हा मी तुमच्या डोळ्यात पाहते, तेव्हा मला रडायचं नाही, तर लढायचं बळ मिळतं.” त्यांच्या या वक्तव्यावर कार्यकर्त्यांमधून ‘वहिनी आय लव्ह यू’ अशी हाक देण्यात आली. त्यावर सुनेत्रा पवार थोड्या हसल्या आणि त्यांनीही ‘आय लव्ह यू टू’ असे उत्तर दिले.
अजित पवार यांना अश्रू कधीच आवडत नसत, असेही सुनेत्रा पवार यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे त्यांच्या भाषणातून अजित पवार यांच्या आठवणी आणि त्यांच्याशी जोडलेल्या भावनांना उजाळा मिळाला.दरम्यान, यापूर्वी एका कार्यक्रमात अजित पवार यांनाही कार्यकर्त्यांनी ‘दादा आय लव्ह यू’ असे म्हटले होते. त्यावेळी अजित पवार यांनी मिश्किल टिप्पणी केली होती. “आता मला घरी गेल्यावर बायको जोड्यानेच हाणल. माझ्या एवढं प्रेम तू आधी तुझ्या बायकोवर कर आणि मग माझ्यावर कर,” असा मिश्किल सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला होता.
अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्रे सुनेत्रा पवार यांच्या हाती आली. त्यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. त्यानंतर त्या राज्याच्या उपमुख्यमंत्रीही बनल्या. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला. अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार पक्षाची धुरा समर्थपणे सांभाळताना दिसत आहेत.