गिलची कमाल, मेंडिस बेहाल!

अप्रतिम झेलचा VIDEO व्हायरल

    दिनांक :17-Aug-2026
Total Views |
गॉल,
Video of Gill's spectacular catch goes viral भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाने सामन्यावर पकड मजबूत केली. भारतीय गोलंदाजांच्या प्रभावी माऱ्यामुळे श्रीलंकेची फलंदाजी अडचणीत आली असतानाच कर्णधार शुभमन गिलच्या अफलातून क्षेत्ररक्षणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. गिलने घेतलेल्या एका भन्नाट झेलचा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.श्रीलंकेच्या डावातील १७वे षटक कुलदीप यादव टाकत होता. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर कामिंदू मेंडिस स्ट्राइकवर होता. कुलदीपच्या चेंडूवर त्याने शॉर्ट कव्हर्सच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिथे क्षेत्ररक्षणासाठी सज्ज असलेल्या शुभमन गिलने क्षणार्धात प्रतिक्रिया देत डावीकडे झेप घेतली.
 
 

Video of Gill 
 
चेंडू वेगाने आणि जमिनीच्या अगदी जवळून गिलच्या डाव्या बाजूने जात होता. मात्र, गिलने पूर्ण ताकदीने डाइव्ह मारत चेंडू जमिनीला लागण्यापूर्वीच आपल्या हातात टिपला. हा झेल इतका वेगवान आणि अवघड होता की, झेल घेतल्यानंतर स्वतः गिललाही काही क्षण त्यावर विश्वास बसला नाही. त्यानंतर त्याने जल्लोष करत झेल साजरा केला.गिलच्या या शानदार प्रयत्नामुळे भारतीय खेळाडूंमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कामिंदू मेंडिसच्या चेहऱ्यावरही या झेलचे आश्चर्य स्पष्ट दिसत होते. मैदानावरील खेळाडूंसह समालोचकांनीही गिलच्या क्षेत्ररक्षणाचे कौतुक केले. माजी भारतीय क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनीही गिलच्या या जबरदस्त झेलचे विशेष कौतुक केले.
 
 
तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला भारताने ९ बाद ४६० धावांपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली. मात्र, केवळ चार चेंडूंनंतर भारताचा पहिला डाव ४६२ धावांवर संपला. देवदत्त पडिक्कलने १६७ धावांची शानदार खेळी करत भारताच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. ध्रुव जुरेलनेही अर्धशतक करत महत्त्वपूर्ण योगदान दिले. भारताचा डाव संपल्यानंतर श्रीलंकेने फलंदाजीला सुरुवात केली. मात्र, भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच यजमानांवर दबाव निर्माण केला. मोहम्मद सिराजने श्रीलंकेला सुरुवातीचा धक्का दिला, तर कुलदीप यादवनेही महत्त्वाच्या विकेट्स मिळवत श्रीलंकेच्या फलंदाजीला हादरे दिले.लंचपर्यंत श्रीलंकेने २८ षटकांत ५ गडी गमावून ९९ धावा केल्या होत्या. त्यामुळे पहिल्या डावातील भारताच्या मोठ्या धावसंख्येनंतर श्रीलंकेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. या सगळ्या घडामोडींमध्ये मात्र शुभमन गिलच्या अफलातून झेलाने सामन्याच्या तिसऱ्या दिवसाची रंगत आणखी वाढवली आहे.