सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित

साप चावल्यास लस, उपचार अनब मृत्यूची होणार नोंद

    दिनांक :18-Aug-2026
Total Views |
मुंबई
snakebite राज्यातील सर्पदंशांमुळे होणारे मृत्यू आणि अपंगत्व रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने एक मोठा आणि अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे सर्पदंशाला ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. या निर्णयामुळे राज्यातील सर्व शासकीय, खासगी रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये आणि डॉक्टरांना सर्पदंशाच्या प्रत्येक संशयित, संभाव्य किंवा निश्चित घटनेची तसेच मृत्यूची नोंद आरोग्य प्राधिकरणाकडे करणे बंधनकारक असणार आहे.
 
snakebite
 
या निर्णयामुळे सर्पदंशाच्या घटनांचे अचूक संनियंत्रण, रुग्णांवर वेळेत उपचार आणि सर्पविष प्रतिबंधक लस उपलब्धतेचे योग्य नियोजन करणे शक्य होणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. ग्रामीण आणि दुर्गम भागात सर्पदंशाचा धोका सर्वाधिक असतो, त्यामुळे वेळेत उपचार मिळणे अत्यंत गरजेचे असते.
प्रत्येक घटनेची आणि उपचाराची तातडीने नोंद
शासनाच्या या नवीन अधिसूचनेनुसार, आरोग्य संस्था आणि डॉक्टरांना त्यांच्याकडे येणाऱ्या सर्पदंशाच्या प्रत्येक रुग्णाची माहिती संबंधित जिल्हा आरोग्य अधिकारी किंवा जिल्हा शल्यचिकित्सकांना कळवावी लागणार आहे. ही सर्व माहिती आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली किंवा एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत डिजिटल पद्धतीने नोंदवली जाईल. रुग्णाला देण्यात आलेल्या एएसव्ही कुप्यांची संख्या, उपचाराचा परिणाम आणि संदर्भित माहितीचा तपशीलही त्यात समाविष्ट असेल.

नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती
सर्पदंश प्रतिबंध व नियंत्रणासाठी विशेष प्रशासकीय रचना तयार करण्यात आली आहे. राज्यस्तरावर संचालक (रुग्णालये), जिल्हास्तरावर जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी तर महानगरपालिका क्षेत्रात वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांची ’नोडल अधिकारी’ म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. हे अधिकारी संपूर्ण जिल्हयातील सर्पदंशाच्या घटनांवर आणि उपचारांच्या सुविधेवर थेट लक्ष ठेवतील.