अनिल कांबळे
नागपूर,
26-Week Pregnancy यवतमाळ येथील अल्पवयीन मुलीने सुमारे २६ आठवड्यांची गर्भधारणा वैद्यकीय पद्धतीने गर्भपात करण्यासाठी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. नैसर्गिक पालक असलेल्या वडिलांच्या माध्यमातून ही याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेची तातडीने दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने संबंधित प्रतिवाद्यांना नोटीस बजावून उद्या, मंगळवारी दुपारी २.३० वाजेपर्यंत म्हणणे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
न्यायमूर्ती अनिल एस. किलोर आणि न्यायमूर्ती रजनीश व्यास यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. न्यायालयाने अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी तिला वैद्यकीय गर्भपात कायदा, १९७१ अंतर्गत गठित करण्यात आलेल्या यवतमाळ येथील श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील वैद्यकीय मंडळाकडे पाठविले आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार वैद्यकीय मंडळाने मुलीची सखोल वैद्यकीय तपासणी करून तिची सध्याची आरोग्यस्थिती तसेच प्रस्तावित गर्भपात प्रक्रिया तिच्यासाठी वैद्यकीयदृष्ट्या योग्य आणि सुरक्षित आहे किंवा नाही, याबाबत अहवाल तयार करायचा आहे. हा अहवाल १८ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २.३० वाजेपूर्वी उच्च न्यायालयात सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी संबंधित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मुलीला रुग्णालयात दाखल करून गठित वैद्यकीय मंडळामार्फत तिची तपासणी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. याचिकाकर्त्या अल्पवयीन मुलीच्या वतीने ॲड. विवेक आव्हाड आणि ॲड. मनीष चौधरी यांनी बाजू मांडली, तर प्रतिवाद्यांच्या वतीने सरकारी वकील कल्याणी मारपकवार यांनी काम पाहिले. अल्पवयीन मुलीच्या आरोग्याचा आणि सुरक्षिततेचा विचार करून वैद्यकीय मंडळाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर न्यायालय या प्रकरणात पुढील निर्णय घेणार आहे.