अजय देवगणच्या चाहत्यांना मिळणार डबल सरप्राईज

    दिनांक :18-Aug-2026
Total Views |
मुंबई
ajay devgn यावर्षीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत अनेक मोठ्या चित्रपटांचे सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला आले असून, सिनेप्रेमींसाठी ही पर्वणीच ठरली आहे. आता अभिनेता अजय देवगणच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. यंदाची गांधी जयंती अजयच्या चाहत्यांसाठी विशेष ठरण्याची शक्यता आहे. कारण बहुप्रतीक्षित ‘दृश्यम 3’ हा चित्रपट येत्या २ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार असून, याच चित्रपटासोबत अजयच्या आगामी ‘रेंजर’ची पहिली झलकही मोठ्या पडद्यावर दाखवली जाऊ शकते, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे चाहत्यांना एकाच वेळी अजयच्या दोन महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट्सची झलक पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
 
 

ajay devgn fans to get a double treat? ranger teaser may release with drishyam 3 
गेल्या काही दिवसांपासून अजय देवगणच्या ‘रेंजर’ची जोरदार चर्चा सुरू आहे. बॉक्स ऑफिस वर्ल्डवाइडच्या रिपोर्टनुसार, ‘रेंजर’चा टीझर २ ऑक्टोबरला ‘दृश्यम 3’च्या शोदरम्यान थिएटरमध्ये दाखवला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ‘दृश्यम 3’ पाहण्यासाठी थिएटरमध्ये जाणाऱ्या प्रेक्षकांना एका तिकिटात अजयच्या दोन मोठ्या प्रोजेक्ट्सची झलक अनुभवता येऊ शकते. या संभाव्य डबल सरप्राईजमुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
‘रेंजर’ हा ॲक्शन-अॅडव्हेंचर प्रकारातील चित्रपट असल्याचे सांगितले जात आहे. जगन शक्ती या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. विशेष म्हणजे, या सिनेमात अजय देवगणसोबत संजय दत्त आणि तमन्ना भाटिया यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. त्यामुळे ‘रेंजर’ची घोषणा झाल्यापासूनच या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.
जर ‘दृश्यम 3’सोबत ‘रेंजर’चा टीझर खरोखरच प्रदर्शित झाला, तर अजय देवगणच्या चाहत्यांसाठी हा डबल धमाका ठरू शकतो. मोठ्या पडद्यावर ‘दृश्यम 3’चा थरार अनुभवत असताना अचानक ‘रेंजर’ची झलक पाहायला मिळणे हा प्रेक्षकांसाठी नक्कीच रोमांचक अनुभव ठरू शकतो.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘रेंजर’ हा चित्रपट ४ डिसेंबर २०२६ रोजी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. मात्र, या प्रदर्शनाच्या तारखेत बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा चित्रपट पुढील वर्षापर्यंत पुढे ढकलण्याचा विचार निर्माते करत असल्याचीही चर्चा आहे.‘दृश्यम 3’सारख्या मोठ्या फ्रँचायझी चित्रपटासोबत ‘रेंजर’चा टीझर प्रदर्शित करण्याची रणनीती निर्मात्यांसाठी फायदेशीर ठरू शकते. ‘दृश्यम 3’ पाहण्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक थिएटरमध्ये येण्याची अपेक्षा असल्याने त्याच वेळी ‘रेंजर’चा टीझर थेट मोठ्या प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचवण्याची संधी निर्मात्यांना मिळू शकते. मात्र, ‘रेंजर’च्या टीझरबाबत अद्याप निर्मात्यांकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे २ ऑक्टोबरला हा टीझर खरोखरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार का, याकडे आता अजय देवगणच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.