उमरखेड नगर परिषदेत ‘त्रिमूर्ती सरकार’ची मनमानी

विकासकामे ठप्प असल्याचा भाजपा गटनेत्यांचा आरोप

    दिनांक :18-Aug-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
उमरखेड, 
umarkhed-municipal-council : नगर परिषदेत ‘जनशक्ती’च्या सत्तेला आठ महिने पूर्ण झाले असतानाही शहरातील विकासकामांना अपेक्षित गती मिळालेली नाही. पाचही सभापतींना पुरेसे आर्थिक व प्रशासकीय अधिकार दिले जात नसल्याने नपचा कारभार गोंधळात सापडला असून, ‘दोन भाऊ आणि एक साहेब’ यांच्या मनमानीमुळे कर्मचारीही संभ्रमात असल्याचा गंभीर आरोप भाजपाचे नगर परिषद गटनेते विजय हरडफकर यांनी केला. रविवार, 16 ऑगस्ट पत्रपरिषदेत हरडफकर यांनी सत्ताधाèयांच्या कारभारावर जोरदार टीका केली. यावेळी विजय गुजरे, नगरसेवक गोपाळ कलाने व संदीप घाडगे उपस्थित होते.
 
 
y18Aug-Press
 
 
 
शिक्षण विभागाने अतिरिक्त 99 कंत्राटी शिक्षकांची भरती करून नप फंडावर सुमारे 70 लाख रुपयांचा बोजा टाकल्याचा आरोप हरडफकर यांनी केला. काही शाळांमध्ये विद्यार्थी संख्या अत्यल्प असतानाही शिक्षकांची भरती करण्यात आली असून, शासनाकडे शिक्षकांची मागणी करण्याऐवजी नप निधीतून खर्च केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. दुसरीकडे काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बसण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसताना सीसीटीव्ही व डिजिटल बोर्डवर खर्च केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
 
 
शहरातील अनेक भागांत अनियमित तसेच गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाणीपुरवठा विभागाच्या कामकाजावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. क्लोरिन, तुरटी तसेच कंत्राटी कामगारांच्या खर्चाबाबत कागदपत्रे व माहिती सार्वजनिक करण्याची मागणी त्यांनी केली.
 
 
गेल्या आठ महिन्यांत बांधकाम विभागामार्फत नवीन विकासकामांना अपेक्षित चालना मिळाली नसल्याचा आरोप करण्यात आला. प्रशासकीय काळात मंजूर झालेल्या कामांवरच काम सुरू असल्याचे सांगत, रस्ते, नाल्या व इतर मूलभूत सुविधांची कामे रखडल्याचा दावा हरडफकर यांनी केला. मुरुम टाकण्यासारख्या कामांमध्येही पारदर्शक निविदा प्रक्रिया पाळली जाते का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
 
 
शहरातील कचरा, नालीसफाई व स्वच्छतेच्या प्रश्नांकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला. विविध विभागांत अतिरिक्त कर्मचारी भरती करून नगर परिषदेला ‘रोजगार देण्याचे दुकान’ बनविले जात आहे का, असा सवालही भाजपा गटनेत्यांनी उपस्थित केला.
 
 
याशिवाय नगर परिषदेतील कारभाराबाबत प्रश्न उपस्थित करणाèया विरोधकांना धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. काही प्रकरणांबाबत पुरावे गोळा करून जिल्हाधिकाèयांकडे तक्रारी करण्यात आल्याचे सांगत, संबंधित तक्रारींवर अद्याप कारवाई का झाली नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
खुर्ची आणि चिरीमिरी
 
 
जनतेने विकासाला प्राधान्य देत सत्ताधाèयांना बहुमत दिले, मात्र शहराचा विकास कुठेच दिसत नाही. सत्ताधाèयांना विकासकामांसाठी निधीही जुळवता येत नसल्याची केविलवाणी परिस्थिती आहे. ‘कुंकू आम्ही लावतो, पाळणा तुम्ही हलवा’ अशी सध्याची अवस्था झाली आहे. जनतेने दिलेल्या विश्वासाला न्याय देण्याऐवजी केवळ खुर्ची आणि चिरीमिरी हेच ध्येय असल्याचे दिसते, असाही आरोप विजय हरडफकर यांनी केला.