भंडारा,
murder in broad daylight in bhandara शांत म्हणून ओळखला जाणाऱ्या भंडारा शहरात घडणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे पोलिसांचा धाक राहिला की नाही हा प्रश्न उपस्थित होत आहे. आज पुन्हा भरदिवसा एका अल्पवयीन मुलाच्या हत्येने भंडारा शहर हादरले. विशेष म्हणजे हत्या करणाराही अल्पवयीन असल्याचे समजते. मारणारा आणि हत्या झालेला मित्र होते, अशीही माहिती आहे.
आठ दिवसांपूर्वी शहरातील विघ्नहर्ता हॉटेल समोर भर दिवसा असाच हत्तेचा प्रयत्न झाला. या घटनेतील गंभीर जखमी अजूनही रुग्णालयात उपचार घेत आहे. पंधरा दिवसांपूर्वी साडेतीन वर्षाच्या मुलीवर अत्याचाराची घटना घडली. या दोन गुन्हेगारीच्या घटना ताज्या असतानाच आज 18 रोजी संध्याकाळी 5:30 वाजता च्या दरम्यान शहरातील मेंढा भागात असलेल्या नेहरू गार्डन जवळ एका सोळा वर्षीय अल्पवयीन शाळकरी मुलगा अंशु येरकडे याची गुप्तीने वार करून हत्या करण्यात आली. भागीरथ भास्कर शाळेत वर्ग नवव्या वर्गात शिकणारा हा विद्यार्थी घरी जात असताना, ही घटना घडल्याचे समजते. घटनास्थळी मृत विद्यार्थ्यांचे दफ्तर पडले होते.
मिळालेल्या माहितीनुसार अंशु आणि हत्या करणारा अल्पवयीन मुलगा हा मित्र होते. काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये थोडा वाद झाला होता. आज दोघ भेटून चर्चा करीत असताना पुन्हा भांडण झाले. यावेळी मृतकाने आणलेल्या गुप्तीने तो वार करण्याच्या प्रयत्नात असताना त्याच्या हातातील गुप्ती हिसकावून घेत त्याच्यावर मित्राने वार करून जीव घेतल्याची माहिती आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा भंडारा शहरातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. घटनेनंतर मृत विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात जाऊन जाब विचारण्याचा प्रयत्न केला. यावेळी वातावरण काहीसे तापले होते. घटनेनंतर अनेकांनी शहरात ड्रग्स आणि अन्य मादक पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात होत असून पोलीस दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला. मागील काही दिवसात झालेल्या घटना यातूनच घडल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.