BEST कर्मचाऱ्यांचा ‘बेस्ट’वरच दबाव! आजपासून बेमुदत उपोषण

    दिनांक :18-Aug-2026
Total Views |
मुंबई
best workers protest मुंबईतील बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (BEST) कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बेस्ट कामगार संघटनेने आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. संघटनेचे सरचिटणीस शशांक राव यांनी १८ ऑगस्टपासून अनिश्चित काळासाठी उपोषण करण्याची घोषणा केली आहे. या आंदोलनात बेस्टच्या विद्यमान कर्मचाऱ्यांसोबतच खासगी कंपन्यांमार्फत चालवल्या जाणाऱ्या वेट लीज बसमधील कर्मचारी तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मागण्याही मांडल्या जाणार आहेत.
 

best workers protest shashank rao announces indefinite hunger strike from august 18 over pending demands 
बेस्ट कर्मचाऱ्यांचे दीर्घकाळापासून प्रलंबित असलेले वेतन करार तातडीने पूर्ण करून त्यांची अंमलबजावणी करावी, ही संघटनेची प्रमुख मागणी आहे. २०१६ ते २०२१ आणि २०२१ ते २०२६ या कालावधीतील वेतन करार तातडीने लागू करावेत, अशी मागणी संघटनेने केली आहे. त्याचबरोबर सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात आणि मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे समान वेतनश्रेणी बेस्ट कर्मचाऱ्यांनाही लागू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.वेट लीज व्यवस्थेअंतर्गत खासगी कंपन्यांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचाही प्रश्न संघटनेने उपस्थित केला आहे. या कर्मचाऱ्यांना ‘समान कामासाठी समान वेतन’ या तत्त्वानुसार वेतन आणि इतर लाभ मिळावेत, अशी संघटनेची मागणी आहे. याशिवाय सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युइटी आणि इतर अंतिम देयके वेळेवर अदा करावीत, अशीही मागणी करण्यात आली आहे.बेस्ट उपक्रमाच्या आर्थिक परिस्थितीचाही मुद्दा संघटनेने उपस्थित केला आहे. बेस्टचे कामकाज सुरळीतपणे सुरू ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या आर्थिक निधीला तातडीने मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी युनियनने केली आहे.
युनियनच्या म्हणण्यानुसार, मुंबईतील ऑपेरा हाऊस, केनेडी ब्रिज, ४२ येथील बेस्ट वर्कर्स युनियनच्या कार्यालयात १८ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता हे अनिश्चित काळासाठी उपोषण सुरू होणार आहे. कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर ठोस निर्णय होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्यात येईल, असे सरचिटणीस शशांक राव यांनी स्पष्ट केले आहे.
बेस्ट कर्मचाऱ्यांनी यापूर्वी जून महिन्यातही उपोषण केले होते. आता पुन्हा अनिश्चित काळासाठी उपोषण सुरू होत असल्याने या आंदोलनाचा मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. बेस्ट बस सेवा ही दररोज कामानिमित्त प्रवास करणाऱ्या मोठ्या संख्येने नागरिकांसाठी महत्त्वाची ठरते. तुलनेने कमी तिकीट आणि सोयीचा प्रवास यामुळे मध्यमवर्गीय तसेच कामगार वर्गासाठी बेस्ट बस हा मोठा आधार आहे.
त्यामुळे हे उपोषण किती दिवस सुरू राहणार आणि बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर प्रशासनाकडून नेमका कोणता तोडगा काढला जाणार, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.