तभा वृत्तसेवा
पांढरकवडा,
case-of-sexual-assault : अल्पवयीन बालिकेवर अत्याचार केल्याप्रकरणी पांढरकवडा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी सुनील भीमा ऊर्फ भीमराव टेकाम (वय 24, मुलकीपोड, ता. झरी-जामणी, जि. यवतमाळ) याला दोषी ठरवत 20 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. विविध कलमांतर्गत दंडाची शिक्षाही ठोठावण्यात आली आहे. न्यायालयीन कागदपत्रानुसार, ही घटना 10 डिसेंबर 2021 रोजी घडली. पीडित अल्पवयीन मुलीचे वय त्यावेळी 15 वर्षे होते. आरोपीने तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप होता. घटनेनंतर पीडितेचा शोध घेत असताना ती आढळली आणि तिच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर आरोपीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली.

या प्रकरणी पोलिसांनी तपास करून आरोपीविरुद्ध भादंवि कलम 363, 376, 506 तसेच लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण कायदा 2012 मधील कलम 4 व 17 अन्वये गुन्हा दाखल केला होता. तपास पूर्ण करून आवश्यक कागदपत्रे व साक्षी-पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले. प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान एकूण 9 साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता दिलीप निमकर यांनी युक्तीवाद केला. न्यायालयाने उपलब्ध पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि तपास अधिकाèयांची साक्ष विचारात घेतल्यानंतर आरोपीला दोषी ठरविले.
अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. ए. कोठारी, पांढरकवडा यांनी आरोपी सुनील भिमा ऊर्फ भिमराव टेकाम याला पोस्को कायद्यातील कलम 4 अंतर्गत 20 वर्षांची शिक्षा व 7 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास अतिरिक्त 3 महिन्यांची शिक्षा सुनावली. तसेच कलम 17 अंतर्गत 5 वर्षांची शिक्षा व 7 हजार रु. दंड, दंड न भरल्यास 1 महिन्याची शिक्षा, तर भादंवि कलम 506 अंतर्गत 2 वर्षांची शिक्षा व 3 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 1 महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.
या प्रकरणात तपासी अधिकारी मुकुटबन पोलिस निरीक्षक अजित बालकृष्ण जाधव, तसेच सहायक सरकारी अभियोक्ता दिलीप निमकर यांनी काम पाहिले. न्यायालयीन कामकाजात मुकुटबन पोलिस ठाण्यातील शोभा मडावी यांनी सहकार्य केले.