लखनौ
ram-mandir-donations राम मंदिर देणगीतील कथित अनियमितताप्रकरणी उत्तरप्रदेश सरकारने स्थापन केलेल्या एसआयटीने अंतिम अहवाल सादर केला आहे. या अहवालात ट्रस्टचे माजी सरचिटणीस चंपत राय आणि सदस्य डाॅ. अनिल मिश्रा यांचे नाव नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. गृह विभागाने पुढील कार्यवाहीसाठी हा अहवाल राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास यांच्याकडे सोपवला आहे. हा अहवाल ट्रस्टच्या २ सप्टेंबर रोजी होणाऱ्या बैठकीत सादर केला जाईल.
देणगी अनियमिततेचे प्रकरण समोर आल्यानंतर राम मंदिर ट्रस्टने एसआयटी चौकशीची विनंती केली होती. त्यानुसार राज्य सरकारने १३ जून रोजी एसआयटी स्थापन केली होती. लखनौचे विभागीय आयुक्त विजय विश्वास पंत यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या या तीन सदस्यीय एसआयटीत पोलिस महानिरीक्षक किरण एस. आणि विशेष सचिव (वित्त) नील रतन कुमार यांना सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले होते. एसआयटीने २३ जून रोजी प्राथमिक अहवाल सरकारला सादर केला होता. मात्र, देणगी चोरीची चौकशी अजूनही सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्थापन केलेली दुसरी एसआयटी या प्रकरणाची चौकशी करीत आहे. सर्वोच्च न्यायालयाने एसआयटीमध्ये चौकशीची सूत्रे आयपीएस अधिकाऱ्याकडे सोपवण्यास सांगितले होते. त्याचबरोबर यात आर्थिक तज्ज्ञांनाही समाविष्ट करण्याचा निर्देश दिला होता.
त्यानंतर २० जुलै रोजी नवीन एसआयटी स्थापन करण्यात आली होती. यात लखनौ रेंजचे पोलिस महानिरीक्षक किरण एस. पोलिस उपमहानिरीक्षक सोमेन वर्मा आणि वरिष्ठ पोलिस अधीक्षक गौरव ग्रोवर यांचा समावेश होता.