वर्धा,
anay-pandit-book-launch : स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य सोहळ्यात पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण व सत्कार करण्यात आला. यावेळी बाल लेखक अनय पंडित याच्या सातव्या पुस्तकाचे विमोचन पालकमंत्री डॉ. भोयर यांच्या हस्ते करण्यात आले. अनय हा भरत ज्ञान मंडळ या संस्थेचे अध्यक्ष माधव पंडित यांचा नातू आहे.
यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अप्पर जिल्हाधिकारी संजय तेली, परिवीक्षाधिन अधिकारी शोभिका पाठक, माजी सैनिकांचे कुटुंबिय, नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री डॉ. भोयर यांच्याहस्ते विरमाता नलीनी टिपले, वीरपत्नी मंदा कोल्हे यांचा यांचा सत्कार करण्यात आला. हिंगणघाट तालुयातील दारोडा टोलनाका येथे नाकाबंदी करुन घरफोडीतील अट्टल तीन आरोपीस अटक केल्याबद्दल वर्धा पोलिस दलातील अधिकारी व अंमलदार यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. पोलिस दलात उत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल पोलिस निरिक्षक विनोद चौधरी, पोलिस हवालदार शिवकुमार कुंभारे, गजानन लामसे यांचाही सत्कार करण्यात आला.
राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र नाचणगावला राष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र प्राप्त झाल्याबद्दल जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील बेले व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद झाडे यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांची जयंती व जलसंधारण दिनानिमित्त मृद व जलसंधारण विभागामार्फत २१ ऑगस्ट रोजी आयोजित महावॉकेथॉनच्या लोगोचे प्रकाशन तसेच अनय श्रीरंग पंडीत यांच्या स्वातंत्र्य सैनिकांवर आधारित ‘स्वातंत्र्याच्या ज्वाळा’ या ७ व्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.