‘देवखेळ 2’चा थरारक टीझर रिलीज

प्राजक्ता माळीच्या गूढ अवताराने वाढवली उत्सुकता

    दिनांक :18-Aug-2026
Total Views |
devkhel 2 teaser कोकणातील शंकासूर प्रथेवर आधारित काल्पनिक कथा मांडणारी ‘देवखेळ’ ही वेब सीरिज फेब्रुवारी २०२६ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. अंकुश चौधरी आणि प्राजक्ता माळी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या सीरिजच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. आता या सीरिजचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून ‘देवखेळ 2’चा थरारक टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. पहिल्याच झलकने कथेविषयीची उत्सुकता आणखी वाढवली आहे.
 

devkhel 2 teaser 
‘देवखेळ 2’च्या टीझरमध्ये प्राजक्ता माळी एका वेगळ्याच आणि गूढ अंदाजात दिसत आहे. टीझरची सुरुवात भयावह वातावरण, रहस्यमय प्रसंग आणि पात्रांच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या अस्वस्थतेने होते. कथेबाबत फारशी माहिती उघड करण्यात आलेली नसली, तरी दुसऱ्या भागाची कथा पहिल्यापेक्षा अधिक गडद, रहस्यमय आणि थरारक असणार असल्याचे संकेत टीझरमधून मिळतात.
प्राजक्ता माळीचा लूक हा या टीझरमधील सर्वाधिक लक्षवेधी भाग ठरला आहे. आतापर्यंत प्रेक्षकांनी तिला विविध भूमिकांमध्ये पाहिलं आहे; मात्र ‘देवखेळ 2’मध्ये तिचा दिसणारा हा गूढ आणि थरारक अवतार चाहत्यांसाठी नक्कीच वेगळा अनुभव ठरणार आहे. तिच्या व्यक्तिरेखेभोवती नेमकं कोणतं रहस्य दडलं आहे, याचा उलगडा मात्र टीझरमध्ये करण्यात आलेला नाही.
पहिल्या भागाला मिळालेल्या प्रतिसादामुळे ‘देवखेळ 2’कडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. यावेळी कथेत भीती, गूढता, अनपेक्षित वळणं आणि नव्या रहस्याचा समावेश असल्याचे संकेत मिळत आहेत. प्राजक्ता माळीनेही टीझर शेअर करताना दुसरा भाग पहिल्यापेक्षा अधिक रंजक असल्याचे म्हटले आहे.
“जेव्हा मी देवखेळ वाचत होती, तेव्हाच मला समजलं होतं की दुसरा भाग येणार आहे. हा दुसरा भाग पहिल्यापेक्षाही अधिक रंजक असेल, हेसुद्धा मला माहीत होतं, खासकरून सारिका म्हणून.. आणि पहा त्याची झलक,” असं म्हणत प्राजक्ताने ‘देवखेळ’ला दिलेल्या प्रेमाबद्दल प्रेक्षकांचे आभार मानले. “घेऊन येत आहोत ‘देवखेळ 2’. दुसऱ्या अध्यायाला सुरुवात होणार, नवा मर्डर नवं रहस्य घेऊन येणार,” असं कॅप्शन तिने टीझरसोबत दिलं आहे.
दरम्यान, ‘देवखेळ’च्या पहिल्या devkhel 2 teaser भागावर कोकणातील स्थानिकांनी तीव्र आक्षेप नोंदवला होता. या सीरिजमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील नमन-खेळे या पौराणिक आणि प्राचीन हिंदू लोककलेचं विपरित चित्रण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच लोककलेतील शंकासूर या दैवताचं अपमानकारक चित्रण केल्याचा आरोपही कोकणातील नागरिकांनी केला होता. या वादानंतर हा मुद्दा विधानसभेतही पोहोचला होता. त्यामुळे ‘देवखेळ 2’मध्ये या पार्श्वभूमीचा किंवा स्थानिकांच्या आक्षेपांचा काही संदर्भ येणार का, याबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे.मात्र, सध्या ‘देवखेळ 2’च्या कथानकाबाबत निर्मात्यांनी अधिकृतपणे फारशी माहिती समोर आणलेली नाही. ‘नवा मर्डर, नवं रहस्य’ या घोषणेमुळे दुसऱ्या भागात नेमकं कोणतं गूढ उलगडणार आणि सारिकाच्या व्यक्तिरेखेची भूमिका काय असणार, याकडे आता प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.