जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष विलास काटेखाये यांचा राजीनामा!

जिल्ह्याच्या राजकारणात घडामाेड

    दिनांक :18-Aug-2026
Total Views |
भंडारा, 
vilas katekhaye resigns भंडारा जिल्हा दूग्ध उत्पादक संस्थासंघाचे अध्यक्ष विलास काटेखाये यांनी १७ ऑगस्ट राेजी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. अवघा एक वर्षाचा कालावधी पूर्ण हाेताच दिलेला राजीनामा नेमका कशामुळे, हा अनेकांसाठी उत्सुकतेचा विषय झाला आहे.
 
 
vilas katekhaye resigns
 
 
शेतीनंतर दुग्ध व्यवसायाला जिल्ह्यात महत्त्वाचे स्थान आहे. जिल्ह्यातील दुग्ध उत्पादकांच्या हिताच्या दृष्टीने काम करणारी प्रमुख संस्था म्हणून भंडारा जिल्हा दूग्ध उत्पादक संघाकडे पाहिले जाते. यापूर्वीही विलास काटेखाये बरेच वर्षे संघाचे अध्यक्ष हाेते. मात्र त्यानंतर त्यांनी संघापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला हाेता. दरम्यान मागील वर्षी दुग्ध संघाच्या संचालक मंडळाची निवडणूक झाली. या निवडणुकीत महायुती म्हणून लढविलेल्या पॅनलचे नेतृत्व विलास काटेखाये यांनी केले हाेते. पॅनलचे अधिकाधीक संचालक निवडून आल्यानंतर ४ ऑगस्ट २०२५ राेजी विलास काटेखाये यांची संघाच्या अध्यक्षपदी निवड झाली हाेती.
मात्र हा निवडीपासूनच अनेकांच्या पाेटात दुखणे भरल्याचे चित्र हाेते. त्यामुळे विलास काटेखाये अध्यक्षपदाचा राजीनामा देणार, अशी चर्चा अनेक महिन्यांपासून हाेती. दरम्यान दाेन दिवसांपूर्वी १७ ऑगस्ट राेजी काटेखाये यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा संघाचे कार्यकारी संचालक करण रामटेके यांच्याकडे साेपविला.vilas katekhaye resigns नवीन सहकार नियमानूसार राजीनामा देताच, ताे स्विकृत हाेत असल्याने आता काटेखाये यांची अध्यक्ष म्हणून सुरू झालेली कारकिर्द अवघ्या १ वर्षे १७ दिवसात संपली आहे.
या राजीनाम्यानंतर अनेक प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. राज्यात, केंद्रात महायुतीची सत्ता असताना, महायुतीच्या ताब्यातील संघाच्या अध्यक्षांनी राजीनामा का दिला, या संदर्भात चर्चांना उत आले आहे. काही अंतर्गत कुरघाेड्या याला कारणीभूत असल्याचेही समजते. दरम्यान राजीनाम्या नंतर विलास काटेखाये यांच्याशी संपर्क केला, आपण काही अपरिहार्य कारणाने राजीनामा दिला असे ते म्हणाले.