डोमिनोज पिझ्झा अन् जय कृष्ण बेकरीचा परवाना निलंबीत

*एफडीएची कारवाई

    दिनांक :18-Aug-2026
Total Views |
वर्धा, 
fda-action : शहरातील केळकरवाडी आर्वी मार्गावरील डोमिनोज पिझ्झा आणि औद्योगिक वसाहत भागातील जय कृष्णा बेकरी या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न विभागाने निलंबीत केला आहे. ही कारवाई मंगळवार १८ रोजी करण्यात आली. अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मे. जुबिलंट फूड वर्स लिमिटेड (डोमिनोज पिझ्झा), सुभाषचंद्र वॉर्ड, वर्धा या आस्थापनेची अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न विभागाच्या अधिकार्‍यांनी ९ जुलै रोजी तपासणी केली तर एमआयडीसी भागातील जय कृष्णा बेकरीची २४ जुलै रोजी अन्न सुरक्षा अधिकारी रविराज धाबर्डे यांनी तपासणी केली.
 
 
j
 
तपासणी दरम्यान या दोन्ही आस्थापनांत अन्न सुरक्षा मानके कायद्यानुसार आवश्यक असणारी स्वच्छता आढळून आली नाही. त्यामुळे संबंधित आस्थापनेला सुधारणा करण्याकरिता १५ दिवसांची सुधारणा नोटीस सहाय्यक आयुक्त (अन्न) प्रफुल्ल टोपले यांनी बजावला. मात्र, सुधारणा नोटीसचा कालावधी उलटूनही संबंधित पेढींनी आवश्यक सुधारणा केल्या नाही. एवढेच नव्हे तर तसेच अहवाल सादर केला नाही. विहित कालावधीत आवश्यक असणार्‍या सुधारणांची पूर्तता न केल्याने त्यांची सुनावणी घेण्यात आली. आस्थापनेची सुनावणी सहायक आयुक्त (अन्न) प्रवीण उमप यांच्या समक्ष घेण्यात आली. सुनावणीवेळी देखील समाधानकारक पूर्तता अहवाल सादर न केल्याने या दोन्ही पेढींचा अन्न परवाना निलंबीत करण्यात आला असल्याचे कळवण्यात आले.
 
 
 
अन्नविषयक परिसराची स्वच्छता, स्वच्छता वेळापत्रकानुसार किंवा स्वच्छता कार्यक्रमानुसार केली जात नाही आणि परिसराच्या स्वच्छतेसाठी कोणताही कार्यक्रम किंवा वेळापत्रक उपलब्ध नव्हते. अन्नाच्या संपर्कात येणारे पॅकेजिंग साहित्य फूड-ग्रेडचे आहे किंवा नाही आणि त्यांचे एनएबीएल मान्यताप्राप्त प्रयोगशाळांकडून प्रमाणपत्रे, पेढीत काम करणार्‍या कामगारांचे वैद्यकीय प्रमाण पत्र, पाणी पिण्यायोग्य असल्याचे प्रमाणपत्र उपलब्ध नव्हते. पेढींत माशांचा प्रादुर्भाव आढळून आला होता. तसेच पेढीत मोठ्या प्रमाणात अस्वच्छता व कायद्यानुसार आवश्यक तरतुदींचे पालन केल्याचे आढळून न आल्याने ही कारवाई करण्यात आली.