शहरातील नामांकित शाळांना बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी देणारे ई-मेल

    दिनांक :18-Aug-2026
Total Views |
 अनिल कांबळे 
 
नागपूर

nagpur bomb threat शहरातील नामांकित १२ शाळांना आज मंगळवारी  सकाळी दहा वाजता बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देणारे ई-मेल आले आहेत. शाळा प्रशासनाने धमकीचे ई मेल प्राप्त होताच पोलिसांना माहिती दिली. या घटनेमुळे शहरात एकच गोंधळ उडाला असून पोलिस आणि शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. या धमकीची माहिती पालकांना मिळताच पालकांनी शाळांसमोर मोठी गर्दी केल्यामुळे आणखीच गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. पोलिसांनी गांभीर्य दाखवून शाळांमध्ये बॉम्बशोधक नाशक पथके पाठवून तपासणी करण्यास सुरुवात केली आहे.
 


bb 
 
 
आज मंगळवारी सकाळी दहा वाजता शहरातील सेंटर पॉईंट, दिल्ली पब्लिक स्कूल, केंद्रीय विद्यालयाच्या अजनी, काटोल, वायुसेना नगर येथील शाळांच्या मुख्याध्यापकांना शाळांच्या अधिकृत संकेतस्थळावर एक अनोळखी ई-मेल प्राप्त झाला. त्यात शाळांमध्ये बॉम्बस्फोट करण्याची धमकी देण्यात आली. मुख्याध्यापकांनी लगेच पोलिसांना माहिती दिली. तसेच शिक्षकांनाही एकत्र बोलवून त्यांना माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांना कोणतीही माहिती न देता शांतपणे सुरक्षित जागेवर, मैदानावर हलविण्यात आले. बाॅम्बची धमकी मिळाल्यानंतर संबंधित पोलिस ठाण्यांच्या पथकाला अलर्ट देण्यात आला. पोलिसांची पथके त्वरित शाळांमध्ये दाखल झाली. धमकीच्या मेलची तात्काळ गंभीर दखल घेत सर्व शाळांमध्ये बाॅम्ब शोध व नाशक पथकाला पाठविण्यात आले. पथकाने संपूर्ण परिसर रिकामा करत तपासणी सुरू केली. सोबतच पोलिसांनी बाॅम्बचा नेमका ठिकाणा शोधण्यासाठी अकराच्या सुमारास श्वान पथकाला देखील पाचारण केले.
 

dh 
 
 
सायबर विभाग सतर्क
 
 
सकाळी धमकीचा ई मेल मिळाल्यानंतर सायबर शाखा सतर्क झाली. सायबर पोलिसांनी ई मेल पाठवणाऱ्या आयपी पत्त्याची तपासणी सुरू केली आहे. हा मेल नेमका कुठून आला? मेल कोण पाठवला? याचा तपास केला जात आहे. तसेच त्या ई-मेलबाबत आणखी माहिती घेण्यात येत आहे. यापूर्वी दिल्ली आणि बंगळुरु शहरातील अनेक शाळांना अशाच प्रकारचे बॉम्बस्फोट घडविण्यासंदर्भात ई-मेल आले होते. मात्र, तो ई-मेल बोगस असल्याचे स्पष्ट झाले होते.
 

dh 

ई-मेल बोगस असल्याची शक्यता
 
 
नागपूर पोलिसांनी सर्वच शाळांची तपासणी केली. आतापर्यंत तरी या शाळांमध्ये काहीही सापडलेले नाही. त्यामुळे शाळांना आलेले ईमेल बोगस असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात येत असल्याचा मेसेज धमकी आलेल्या शाळांपैकी एका शाळेने पालकांना पाठवला. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. चिंताग्रस्त पालकांनी शाळांबाहेर गर्दी केली. मुलांना सुरक्षित घरी नेण्यासाठी अनेक पालक शाळांच्या गेटवर पोहोचले.