वर्धा,
farmer-defrauded : जेसीबीचा १५ लाखात सौदा झाला. २० जुलै २०२५ रोजी ५ लाख रुपये देऊन विक्री पावती तयार केली. त्यानंतर २६ सप्टेंबर २०२५ रोजी विक्री करून उर्वरित १० लाख रुपये दिले. जेसीबीही ताब्यात दिली. मात्र, मी घेतलेले एक काम अपूर्ण असून ते काम पूर्ण करण्यासाठी फिर्यादीला विश्वासात घेऊन जेसीबी घेऊन गेला. मात्र, आता जेसीबी परत करीत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच आर्वी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. देवेंद्र गुल्हाने (५१) रा. गांधी चौक आर्वी असे फिर्यादीचे तर कैलाश कटयारी (४२) रा. सिंधी कॅम्प, रामनगर वार्ड आर्वी असे फसवणूक करणार्याचे नाव आहे.

देवेंद्र गुल्हाने यांनी कैलाश कटियारी यांच्याकडून १८ जून २०२५ रोजी १५ लाखांत जेसीबी घेतला. २० जून रोजी एम. एच. ३२ ए. एस. १८५८ या वाहनाची विक्री पावती तयार करून कटयारी यांना ५ लाख रुपये दिले. उर्वरित १० लाख रुपये २६ सप्टेंबर २०२५ रोजी विक्रीनंतर दिले. आरसी बूक, जेसीबीवरील कोटॅक महिंद्रा बँक लिमिटेड फायनान्सचे कर्ज प्रलंबित असल्याने ते कर्ज भरून एनओसी आणून आरटीओ कार्यालयात जावून वाहन ट्रान्सफर करण्याची हमी कैलाश कटियारी यांनी नोटरीमध्ये दिली होती. ८ डिसेंबर २०२५ रोजी कैलाशने बँकेचे एनओसी सर्टिफिकेट आणून दिले. त्यानंतर ४ जानेवारीला जेसीबी ट्रान्सफरसाठी परिवहन विभागाच्या ऑनलाईन प्रक्रिया केली. ७ जानेवारीला कैलाश हा देवेंद्र गुल्हाने यांच्या घरी आला. मी एक काम घेतले होते ते काम अपूर्ण असून पेमेंट अडकले आहे. त्यामुळे देवेंद्रला विश्वासात घेत कैलाश जेसीबी घेऊन गेला. मात्र, तेव्हापासून कैलाश हा देवेंद्रशी फोनवर वाद घालत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. आरटीओ कार्यालयातील उर्वरित प्रक्रियाही पूर्ण करून देत नसून टाळाटाळ करीत आहे. सध्या तो बाहेरगावी राहत असून फोन उचलणेही बंद केले आहे. सोबतच कैलाशचे दुकानही बंद असून त्याच्या घरी जेसीबी मशिन संदर्भात विचारणा करण्यास गेले असता कुटुंबीय पोलिसात तक्रार देण्याची धमकी देत असल्याचे देवेंद्र गुल्हाने यांनी तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी कैलाश कटियारी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.