गोंदिया,
gondia-news : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजकारणात मंगळवार, १८ ऑगस्ट रोजी मोठी उलथापालथ झाली असून बाजार समितीचे सभापती भावराव उके आणि उपसभापती राजकुमार उर्फ ‘पप्पू’ पटले यांच्याविरुद्ध आणण्यात आलेला अविश्वास ठराव १५ विरुद्ध शुन्य मतांनी मंजूर झाला आहे. त्यामुळे दोन्ही पदाधिकार्यांना पदावरून पायउतार व्हावे लागले आहे.

एकूण १८ पैकी १५ संचालकांनी एकत्र येत अभूतपूर्व एकजुटता दाखवत अविश्वास ठरावाच्या बाजूने कौल दिला. अविश्वास ठरावावर चर्चा आणि मतदानासाठी उपविभागीय अधिकारी चंद्रकांत खंडाईत यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत उपस्थित १५ सर्व संचालक व संचालिकांनी हात उंचावून अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले. या राजकीय घडामोडीत विशेष बाब म्हणजे सभापती भाऊराव उके आणि उपसभापती राजकुमार पटले हे या बैठकीला अनुपस्थित राहिले. त्यांच्यासोबत आणखी एक संचालक महेश अग्रवाल हे सुध्दा बैठकीस गैरहजर होते. दरम्यान, संचालक मुनेश रहांगडाले, धनंजय तुरकर, राजीव ठकरेले, ओमेश्वर चौधरी, चेतनकुमार बहेकार, राधाकृष्ण ठाकूर, कौशल तुरकर, शामकला पाचे, जितेश टेंभरे, पंकज यादव, मुरलीधर नागपुरे, धनलाल ठाकरे, अरुण गजभिये, सुमित भालोटिया आणि विजय उके या १५ संचालकांनी अविश्वासाच्या बाजूने मतदान केले. या सर्व १५ संचालकांच्या अभूतपूर्व एकजुटीमुळे बाजार समितीतील सत्तेची गणिते पूर्णपणे बदलली असून आता नवीन नेतृत्वाच्या निवडीबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.