विद्यार्थ्यांचा सन्मानातून आत्मविश्वास वाढतो : तडस

    दिनांक :18-Aug-2026
Total Views |
तळेगाव (टा.), 
ramdas-tadas : आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच देशभक्ती, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रप्रेमाची जाणीव करून देणे आवश्यक आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान हा केवळ त्यांच्या यशाचा गौरव नसून इतर विद्यार्थ्यांनाही मेहनत, जिद्द आणि सातत्याने पुढे जाण्याची प्रेरणा देणारा आहे. अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नवी ऊर्जा मिळते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे आयोजन सातत्याने झाले पाहिजे, असे प्रतिपादन माजी खासदार रामदास तडस यांनी केले.
 
 
j
 
भारतीय जनता पार्टी, तळेगाव (टा.) व मिलिंदजी भेंडे मित्र परिवार यांच्या संयुत वतीने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा तसेच देशभक्तीपर गीत गायन व नृत्य कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष संजय गाते, जिपचे माजी सभापती मिलिंद भेंडे, आदी उपस्थिती होते.
 
 
विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रासोबतच विविध कला व सांस्कृतिक क्षेत्रातही आपली गुणवत्ता सिद्ध करावी. देशभक्तीपर गीत व नृत्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ होते. तळेगाव परिसरातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असून, भविष्यातही अशा उपक्रमांना सहकार्य केले जाईल, असे जिल्हाध्यक्ष गाते म्हणाले. प्रास्ताविक मिलिंद भेंडे यांनी केले. संचालन शिवा चांबटकर, दिव्यानी खोंड यांनी केले तर आभार गजानन भोयर यांनी मानले.