नागपूर/खापरखेडा,
shravan श्रावणातील पहिला सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी आल्याने जिल्ह्यात धार्मिक उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शिवमंदिरे व नागदेवतेच्या पूजास्थळी पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी होती. महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक आणि नागदेवतेला दूध-लाह्यांचा नैवेद्य दाखवत सुवासिनींनी कुटुंबाच्या व भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. या दुहेरी योगामुळे शिवपूजेला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते.
खापरखेडा येथील रेल्वे चौकी परिसरातील प्रसिद्ध नाग मंदिरात श्रावणी सोमवार आणि नागपंचमीच्या दुहेरी पर्वावर नागद्वार पंच कमिटीतर्फे आयोजित चार दिवसीय नागपंचमी महोत्सवात भक्तिसागर ओसंडून वाहिला. महोत्सवात महिला-पुरुष भजन मंडळांची सुरेल भजने, पारंपरिक शहनाई वादन आणि नागिनच्या धुनने भाविकांना मंत्रमुग्ध केले. नागपंचमीला पहाटेपासूनच भाविकांनी शिस्तबद्ध रांगेत उभे राहून नागदेवतेला दुधाचा अभिषेक व नारळ अर्पण करून सुख-समृद्धीचे साकडे घातले.
या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरलेला १०१ किलो रवा, शुद्ध तूप व साखरेचा 'कढईचा प्रसाद' हजारो भाविकांनी ग्रहण केला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अरुण बोरीकर, रोहित बोरीकर, चतुर्वेदी महाराज, दुर्गा यादव, श्रीकांत उमाले, मनोज सारंगे, असलम शेख, राजू ढोले यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.