कारंजा लाड,
seized-cannabis : शेलूबाजारकडून कारंजाकडे येणार्या मार्गावर कारंजा शहर पोलिसांनी कारवाई करून १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ११ किलो ९३५.२ ग्रॅम गांजा जप्त केला. या प्रकरणी एका संशयितास अटक करण्यात आली असून, गांजा, ऑटो व भ्रमणध्वनी असा ८ लाख १ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

१५ ऑगस्ट रोजी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास तेजस मंगल कार्यालयासमोरील महावितरण कार्यालयाजवळ शेलूबाजारकडून येणार्या मार्गावर ही कारवाई करण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसमक्ष छापा टाकला. यावेळी हमीद खान अफसर खान रा. तर्हाळा, ता. मंगरूळनाथ याच्या ताब्यातून ११ किलो ९३५.२ ग्रॅम गांजा आढळून आला. जप्त गांजाची किंमत ५ लाख ९६ हजार ७६० रुपये, ऑटोची किंमत दोन लाख रुपये, तर भ्रमणध्वनीची किंमत पाच हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक महेश नेवारे यांच्या फिर्यादीवरून कारंजा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक अमर चोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अजय धनकर, उमेशकुमार बिबेकर, मयुरेश तिवारी, मोहंमद परसुवाले, अमित भगत, नितीन पाटील व अनिस निनसुरवाले यांच्या पथकाने ही कारवाई केली.