क्रोम युजर्ससाठी सरकारचा मोठा अलर्ट!

    दिनांक :18-Aug-2026
Total Views |
मुंबई,
chrome users
गुगल क्रोमचा वापर करणाऱ्या युजर्ससाठी महत्त्वाची सूचना समोर आली आहे. भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद पथक अर्थात CERT-In ने डेस्कटॉप क्रोममधील अनेक गंभीर सुरक्षा त्रुटींबाबत उच्च-स्तरीय सुरक्षा इशारा जारी केला आहे. या त्रुटींचा गैरफायदा घेत हॅकर्स संगणकावर अनधिकृत कोड चालवण्यासोबतच संवेदनशील माहिती मिळवू शकतात किंवा संगणकाच्या कार्यप्रणालीत अडथळा निर्माण करू शकतात.
 
chrome users
 
CERT-In च्या माहितीनुसार, गुगल क्रोमच्या डेस्कटॉप आवृत्तीतील Chrome V8, TabStrip, HTML, Extensions आणि Blink या घटकांमध्ये ‘use-after-free’ प्रकारच्या सुरक्षा त्रुटी आढळल्या आहेत. या त्रुटींचा फायदा घेण्यासाठी हॅकर्स खास तयार केलेली वेबसाइट, वेबपेज किंवा वेब रिक्वेस्ट वापरू शकतात. वापरकर्त्याने अशा धोकादायक लिंकवर क्लिक केल्यास किंवा संकेतस्थळ उघडल्यास संगणकाच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो.
 
या सुरक्षेच्या त्रुटींचा परिणाम Windows, macOS आणि Linux या प्रणालींवर क्रोम वापरणाऱ्या ग्राहकांवर होऊ शकतो. Windows आणि macOS वर Chrome ची 151.0.7922.137/.138 पेक्षा जुनी आवृत्ती वापरणाऱ्या युजर्सना धोका असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच Linux साठी 151.0.7922.137 पेक्षा जुन्या आवृत्त्या प्रभावित होऊ शकतात.
 
हल्ला यशस्वी झाल्यास संवेदनशील माहिती, पासवर्ड आणि बँकिंगशी संबंधित तपशील चोरीला जाण्याची शक्यता आहे. याशिवाय संगणकाच्या मेमरीमध्ये बिघाड होणे किंवा काही महत्त्वाच्या सेवा विस्कळीत होण्याचा धोका देखील निर्माण होऊ शकतो. त्यामुळे जुन्या आवृत्तीवर क्रोम वापरणे टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
 
सुरक्षा त्रुटी दूर करण्यासाठी गुगलने आवश्यक सुरक्षा अद्ययावत उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. वापरकर्त्यांनी आपल्या संगणकावर गुगल क्रोम उघडून तीन ठिपक्यांच्या मेनूमधील ‘Help’ आणि त्यानंतर ‘About Google Chrome’ हा पर्याय निवडावा. त्यानंतर क्रोम उपलब्ध अद्ययावत तपासून ते डाउनलोड करेल. अद्ययावत प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ‘Relaunch’ वर क्लिक केल्यास नवीन सुरक्षा अद्ययावत आणि पॅच सक्रिय होतील. सायबर सुरक्षेचा धोका टाळण्यासाठी क्रोम वापरणाऱ्या नागरिकांनी आपल्या ब्राउझरची आवृत्ती तपासून ते तातडीने अद्ययावत करणे महत्त्वाचे आहे.