कुटुंबीयांच्या विरोधाला न जुमानता तरुण-तरुणींचा प्रेम विवाहाकडे कल

- सात महिन्यांत ३४००वर नोंदणी विवाह; ९२ टक्क्यांहून अधिक प्रेमविवाह

    दिनांक :18-Aug-2026
Total Views |
अनिल कांबळे

नागपूर
nagpur love marriage trend सध्या प्रेमविवाह करण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. प्रेमसंबंधाला कुटुंबीयांचा विरोध असल्यास प्रियकर आणि प्रेयसी थेट नोंदणी विवाह करण्यावर भर देतात. प्रेमविवाहाला कुटुंबीयांचा विरोध असल्यास थेट नोंदणी विवाह करण्याचा मार्ग तरुण-तरुणींकडून मोठ्या प्रमाणात स्वीकारला जात आहे. नागपूर शहरात यंदाच्या सात महिन्यांत तब्बल ३ हजार ४०० वर नोंदणी विवाह झाले असून, त्यापैकी ९२ टक्क्यांहून अधिक विवाह हे प्रेमविवाह असल्याची माहिती नोंदणी कार्यालयातून मिळाली आहे. विशेष म्हणजे, कुटुंबीयांच्या विरोधामुळे नोंदणी विवाह केल्यानंतरच घरच्यांना लग्नाबाबत विचारणा करण्याचे प्रमाणही वाढले आहे.
 

nagpur love marriage trend 3,411 registration marriages recorded till july 2026 
गेल्या काही वर्षांत तरुण-तरुणींमध्ये स्वतःचा जीवनसाथी निवडण्याची प्रवृत्ती वाढली आहे. महाविद्यालयीन युवक-युवतींमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाल्यानंतर थेट लग्न करुन सुखी संसाराचे स्वप्न रंगविल्या जाते. छाेटेसे घरे, कुटुंब आणि संसार अशी स्वप्ने प्रेमी युगुल रंगवितात. मात्र, जात, धर्म, आर्थिक परिस्थिती किंवा अन्य कौटुंबिक कारणांमुळे अनेकदा या विवाहांना कुटुंबीयांकडून विरोध केला जातो. अशा परिस्थितीत आईवडिलांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतात. तेथे यश न मिळल्यास जवळपास बरेच प्रेमी युगुल नोंदणी विवाहाचा पर्याय निवडतात. विवाहाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच ते कुटुंबीयांना माहिती देतात. त्यामुळे विवाह झाल्यानंतर मुलगा किंवा मुलगी परत आल्याने कुटुंबीयांसमोरही स्वीकार करण्याशिवाय पर्याय उरत नाही. नोंदणी विवाहामध्ये आंतरजातीय विवाहांचे प्रमाणही लक्षणीय आहे. विविध जातींतील तरुण-तरुणी प्रेमसंबंधात आल्यानंतर कुटुंबीयांकडून विरोध होण्याची शक्यता असल्याने ते नोंदणी विवाहाला प्राधान्य देत आहेत. कायदेशीर पद्धतीने विवाह झाल्यामुळे नंतरच्या काळात निर्माण होणाऱ्या कौटुंबिक किंवा सामाजिक दबावाला सामोरे जाण्यास त्यांना काही प्रमाणात आधार मिळतो.
 
विवाहाचे चित्र बदलले
 
नोंदणी विवाहासाठी आवश्यक कागदपत्रे, साक्षीदार आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर विवाहाची अधिकृत नोंद केली जाते. त्यामुळे पारंपरिक विवाह सोहळ्याऐवजी कमी खर्चात आणि तुलनेने सोप्या पद्धतीने विवाह करण्याकडेही काही जोडप्यांचा कल वाढला आहे. सात महिन्यांतील ३४०० नोंदणी विवाहांपैकी ९२ टक्क्यांहून अधिक प्रेमविवाह असल्याने बदलत्या सामाजिक मानसिकतेचे हे चित्र मानले जात आहे.
नोंदणी विवाहाची प्रमुख कारणे
 
- कुटुंबीयांकडून प्रेमविवाहाला विरोध
- आंतरजातीय विवाहाला विरोध होण्याची भीती
- स्वतःचा जीवनसाथी निवडण्याचा निर्णय
- कमी खर्चात विवाह करण्याची इच्छा
- विवाहाला तातडीने कायदेशीर मान्यता मिळविण्याचा पर्याय
 
नोंदणी विवाहाची संख्या वाढली
गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी नोंदणी विवाहाची संख्या वाढली. २०२५ मध्ये ४ हजार ४३० नोंदणी विवाह झाल्याची नोंद आहे. एप्रिल, मे आणि डिसेंबर या महिन्यांत सर्वाधिक नोंदणी विवाह झाले आहेत. तर यावर्षी २०२६ मध्ये जुलै महिन्यांपर्यंत ३ हजार ४११ नोंदणी विवाह झाल्याची नोंद झाली आहे. फेब्रुवारी आणि एप्रिल महिन्यात सर्वाधिक नोंदणी विवाह झाल्याची नोंद आहे.