गुन्हेगारीच्या वाटेवर जाण्याआधीच २८ मुलांना सकारात्मकतेची दिशा

    दिनांक :18-Aug-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
nagpur police मोठमोठ्या गुन्हेगारांना आदर्श मानत त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याच्या मानसिकतेत असलेल्या अल्पवयीन मुलांना गुन्हेगारीच्या वाटेपासून दूर नेण्यासाठी कपिलनगर पोलिसांनी अनोखा आणि समाजाभिमुख उपक्रम राबविला. गुन्हा करण्याआधीच या मुलांना योग्य दिशा देत त्यांच्या मनात देशप्रेम, जबाबदारी आणि सकारात्मक विचारांची बीजे रुजविण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून तब्बल २८ अल्पवयीन मुलांना प्रथमच पोलिस ठाण्यात स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवात सहभागी करून घेत, त्यांना नवीन पांढरे शर्ट भेट देण्यात आले. तिरंग्याला सलामी दिल्यानंतर या मुलांनी ‘नशामुक्त जीवन’ जगण्याची शपथही घेतली.
 
 

nagpur police mission counselling: 28 minors guided away from crime 
 
कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ‘मिशन समुपदेशन’ या उपक्रमांतर्गत हा अभिनव प्रयोग करण्यात आला. या मुलांविरुद्ध अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींच्या संपर्कात किंवा सहवासात असल्याने त्यांची ‘ग्रुप सी’अंतर्गत जोखमीतील मुले म्हणून ओळख करण्यात आली आहे. गुन्हेगारीचे आकर्षण वाढण्यापूर्वीच त्यांच्याशी संवाद साधून योग्य मार्गदर्शन करण्यावर पोलिसांनी भर दिला आहे. कपिलनगरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश आडे यांनी या मुलांना स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमासाठी पोलिस ठाण्यात आमंत्रित केले. प्रत्येक मुलाला नवीन पांढरा शर्ट देण्यात आला. पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत या मुलांनी ध्वजारोहण कार्यक्रमात सहभाग घेतला. तिरंग्याला सलामी देत त्यांनी देशप्रेम आणि सामाजिक जबाबदारीचा अनुभव घेतला. त्यानंतर पोलिसांनी अमली पदार्थांचे सेवन, गुन्हेगारी प्रवृत्ती आणि समाजकंटकांच्या सहवासाचे दुष्परिणाम समजावून सांगत ‘नशामुक्त जीवन’ जगण्याची शपथ दिली. पोलिसांचा हा उपक्रम केवळ समुपदेशनापुरता मर्यादित नसून या मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न आहे. त्यांच्या कलागुणांना वाव देणे, शिक्षणाकडे वळविणे आणि भविष्यात रोजगाराभिमुख बनविण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करणे, असा पोलिसांचा मानस आहे.
एका दिवसाचा उत्सव नव्हे, आयुष्याची नवी सुरुवात
या मुलांविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल नाही. मात्र, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींशी असलेला संपर्क आणि सहवास लक्षात घेऊन त्यांची जोखमीतील मुले म्हणून ओळख करण्यात आली. गुन्हेगारीत सक्रिय होण्यापूर्वीच एखाद्या मुलाला योग्य दिशा मिळाली, तर त्याचे संपूर्ण आयुष्य बदलू शकते. याच विचारातून कपिलनगर पोलिसांनी ‘मिशन समुपदेशन’च्या माध्यमातून प्रतिबंधात्मक पोलिसिंगचा वेगळा आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
 
कपिलनगर पोलिसांचा दृष्टिकोन
एखाद्या अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर कारवाई करण्याऐवजी त्याच्या वर्तणुकीतील धोक्याची चिन्हे वेळीच ओळखून समुपदेशन करण्यावर पोलिसांनी भर दिला आहे. गुन्हेगारी प्रवृत्ती निर्माण होण्याआधीच हस्तक्षेप करून मुलाला सकारात्मक वातावरण देणे, हा ‘मिशन समुपदेशन’चा मुख्य उद्देश आहे.
“गुन्हेगारीत सक्रिय नसलेल्या, मात्र गुन्हेगारांकडे आकर्षित झालेल्या अल्पवयीन मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे. या मुलांनी जीवनात पहिल्यांदाच स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला. पुढील काळात त्यांना कला, शिक्षण आणि रोजगाराभिमुख उपक्रमांशी जोडून सकारात्मक भवितव्य घडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.”
- सतीश आडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कपिलनगर :