अनिल कांबळे
नागपूर
nagpur traffic police स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहर वाहतूक पोलिसांनी गेल्या चार दिवसांत राबविलेल्या विशेष मोहिमेत दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या १२२ वाहनचालकांवर कारवाई केली. संबंधित वाहनचालकांविरुद्ध दाखल करण्यात आलेले चालान मोटार वाहन न्यायालयात सादर केल्यानंतर न्यायालयाने त्यांच्यावर एकूण १६ लाख ८७ हजार रुपयांचा दंड ठोठावला. वाहतूक पोलिसांची ही कारवाई पोलिस उपायुक्त आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्याबरोबरच रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांच्या सर्व परिमंडळांकडून ही संयुक्त मोहीम राबविण्यात आली. शहरातील प्रमुख आणि वर्दळीच्या चौकांवर नाकाबंदी करून वाहनचालकांची तपासणी करण्यात आली. विशेषतः मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. या मोहिमेदरम्यान मद्यप्राशन करून वाहन चालविताना आढळलेल्या १२२ वाहनचालकांवर नियमानुसार कारवाई करण्यात आली. त्यांच्याविरुद्धचे चालान मोटार वाहन न्यायालयात सादर करण्यात आल्यानंतर न्यायालयाने दंडाची कारवाई केली.
परवानाधारकांवरही दंडाचा बडगा
वाहतूक पोलिसांच्या माहितीनुसार, मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. परवानाधारक दुचाकीस्वारांना ११ हजार रुपये, तर विनापरवाना दुचाकी चालविणाऱ्यांना १६ हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावला जात आहे. त्याचप्रमाणे परवानाधारक चारचाकी वाहनचालकांवर १३ हजार रुपयांचा दंड करण्यात येत आहे.
ट्रक तसेच अन्य अवजड वाहनांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास २० ते २५ हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जात आहे. यापूर्वी चालान झाल्यानंतर पुन्हा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर निर्धारित दंडाव्यतिरिक्त ५ हजार रुपयांचा अतिरिक्त दंडही आकारला जात आहे.
कारवाईची धडक पुढेही सुरू राहणार
दारू पिऊन वाहन चालविणे तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्धची मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे. स्वतःसह इतरांच्या जीविताची सुरक्षितता लक्षात घेऊन वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे आणि पोलिसांना सहकार्य करावे.
- आदित्य मिरखेलकर (पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा.)