नाशिक
nashik live-in murder case नाशिक येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या बॉयफ्रेंडची गर्लफ्रेंडने तिच्या मित्राच्या मदतीने हत्या केल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घरातच गळा चिरून हत्या केल्यानंतर मृतदेह तब्बल १८ तास घरात ठेवण्यात आला. त्यानंतर कारमधून मृतदेह कसारा घाटात नेऊन फेकण्यात आल्याचे समोर आले आहे.
वसंत गोरखनाथ सातपुते (वय ४०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सातपुते यांची हत्या केल्यानंतर संशयितांनी मृतदेह घरातच ठेवला. त्यानंतर कारमधून मृतदेह कसारा घाटात नेऊन फेकण्यात आला. विशेष म्हणजे, मृतदेह फेकल्यानंतर संशयित मुंबईत फिरले आणि घरातील रक्ताचे डागही पुसल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणी सुरुवातीला कोणताही गुन्हा दाखल झालेला नसताना पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे या हत्येचा उलगडा झाला. हसिना शेख, तिचा मित्र साहिल शहा आणि त्यांच्या साथीदारांनी कारमधून मृतदेह नेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कसारा घाटात शोधमोहीम राबवली. त्यानंतर मृतदेहाची ओळख पटविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असता तो वसंत गोरखनाथ सातपुते यांचा असल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर हसिना शेख आणि साहिल शहा यांना अटक करण्यात आली आहे. तसेच मोईन शहा यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून, या प्रकरणातील नेमका सहभाग आणि हत्येमागील संपूर्ण घटनाक्रम जाणून घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार,nashik live-in murder case मृत सातपुते हे हसिना यांचे पैसे सतत चोरत होते. तसेच ते मद्यपान करत असल्याचे सांगण्यात येत असून, त्यांना जुगाराचेही व्यसन असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या कारणांवरून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. सातपुते हे हसिना यांना मारहाण आणि शिवीगाळही करत असल्याने त्या त्रस्त झाल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर मित्राच्या मदतीने सातपुते यांची हत्या करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
सध्या पोलिसांकडून हसिना शेख, साहिल शहा आणि मोईन शहा यांच्यासह या प्रकरणाशी संबंधित व्यक्तींची चौकशी केली जात आहे. सातपुते यांची हत्या नेमकी कशा प्रकारे करण्यात आली, हत्येमागील कारण काय होते आणि या गुन्ह्यात आणखी किती जणांचा सहभाग आहे, या सर्व बाबींचा तपास पोलीस करत आहेत.