डिसेंबरमध्ये रामलीला मैदानात मोठे आंदोलन

    दिनांक :18-Aug-2026
Total Views |
मुंबई
babanrao taywade जातीय जनगणनेच्या फॉर्ममध्ये ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम नसल्याने ओबीसी समाजामध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या नाराजीचा लवकरच उद्रेक होण्याची शक्यता असून, ओबीसींचा स्वतंत्र कॉलम जनगणनेत समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी येत्या डिसेंबरमध्ये दिल्लीच्या रामलीला मैदानावर मोठे आंदोलन करण्यात येणार आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी याबाबत घोषणा केली आहे.
 

babanrao taywade 
“आम्ही डिसेंबरमध्ये दिल्लीत धडक देणार आहोत. दिल्लीच्या रामलीला मैदानावर मोठे आंदोलन करणार आहोत,” अशी माहिती बबनराव तायवाडे यांनी दिली. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. जनगणनेच्या फॉर्ममध्ये ओबीसींचा स्वतंत्र रकाना असावा, या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
तायवाडे यांच्या म्हणण्यानुसार, २०१६ पासून केंद्र सरकारकडे ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी करण्यात येत आहे. सुमारे एक वर्षापूर्वी केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली. आता जनगणना सुरू झाली असली तरी त्यामध्ये केवळ जातीचा कॉलम देण्यात आला आहे; ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम देण्यात आलेला नाही. त्यामुळे ओबीसी समाजाची अर्धी मागणी पूर्ण झाली असून, जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम असणे आवश्यक असल्याचे तायवाडे यांनी म्हटले.
“ओबीसींचा रकाना जनगणनेमध्ये अॅड करावा, ही आमची मागणी आहे. त्यासाठी आम्ही रामलीला मैदानावर आंदोलन करणार आहोत,” असे त्यांनी सांगितले. या आंदोलनासाठी राज्यभरातील ओबीसी समाजाला एकत्र आणण्याची तयारी सुरू असल्याचेही तायवाडे यांनी स्पष्ट केले. मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते दिल्लीतील आंदोलनात सहभागी होतील, असा दावा त्यांनी केला.हे आंदोलन संवैधानिक मार्गाने आणि शांततेत करण्यात येणार असल्याचे तायवाडे यांनी सांगितले. जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र रकाना असावा, हीच आंदोलनाची प्रमुख मागणी असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, मराठा समाजाच्या ५८ लाख दाव्याच्या नोंदी सापडल्याच्या मुद्द्यावरही तायवाडे यांनी भाष्य केले. “मराठा समाजाच्या ५८ लाख नोंदी सापडल्या, हे मला मान्य नाही. फार फार तर मराठा समाजाच्या ५९ हजार नोंदी सापडल्या आहेत,” असा दावा त्यांनी केला. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणावर नोंदी सापडणे हेदेखील मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचे यश असल्याचे तायवाडे यांनी म्हटले.