तळेगाव (श्या.पंत),
flag-hoisting-at-talegaon : तीन जिल्ह्यांचा मध्यभाग असलेले तळेगाव बर्याचदा अनेक आश्चर्याच्या गोष्टी करते. या शहराला नवीन काही करण्याची स्वातंत्र्य चळवळीपासुन सवय जडली आहे. तोच वसा घेत येथील पोलिस स्टेशनमध्ये स्वातंत्र्यदिनी स्वत: ध्वजारोहण न करता चक आपल्या सहकार्याला तो मान दिला. ‘तळे’गावमध्ये ‘समुद्रा’एवढे मन ठाणेदाराने दाखवले असेच म्हणावे लागेल.

तळेगाव पोलिस स्टेशन गेल्या काही वर्षांपासुन नवीन आणि सामाजिक घडामोडींमध्ये सहभागी होत असुन सर्व सामान्यांना एक वेगळा विश्वास निर्माण करीत आहे. पोलिस आणि सामान्य नागरिकांमधील दरी कमी करते आहे. दरम्यान, स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करण्याची संधी अभिमानास्पद व तितकीच सन्मानाची बाब! ध्वज फडकविण्याची संधी मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र, ते प्रत्येकाच्या नशिबीही नसते. परंतु, ध्वजारोहणाच्या वेळी ठाणेदार मंगेश भोयर यांनी घेतलेला निर्णय आजपर्यंत भल्याभल्यांना जमला नाही. ठाण्यातील ध्वजारोहण ठाणेदारच करतील असा नियम असताना हा सर्वोच्च मान ठाण्यातील ३१ ऑटोबर रोजी सेवानिवृत्त होत असलेले पोलिस उपनिरीक्षक लीलाधर उकंडे यांना दिला. यापूर्वी सुद्धा प्रजासत्ताक दिनी त्यांनी ध्वजवंदनाचा मान सेवानिवृत्त पोलिस अंमलदार प्रभाकर दुधाट, पोउपनि शाम सोनपरोते यांना दिला होता हे उल्लेखनिय!
सेवानिवृत्तीच्या आधी ध्वजारोहण करणे ही आजपर्यंत केलेल्या सेवेतील सर्वात मोठा सन्मान असल्याची भावना उकंडे यांनी व्यत केली. त्यांनी पोलीस अधीक्षक अग्रवाल, ठाणेदार मंगेश भोयर यांचे आभार मानले.