अनिल कांबळे,
नागपूर,
imposter-policemen : शहरात तोतया पोलिसांचा हैदोस वाढला असून त्यांनी ज्येष्ठ नागरिकांना टार्गेट केले आहे. शहरात फिरुन एकट्या वृद्धाला पोलिस असल्याची बतावणी करुन सोन्याचे दागिणे आणि पैसे लुबाडण्याचा नवा फंडा सुरु केला आहे. अशीच एक घटना सोमवारी दुपारी लक्ष्मीनगर सारख्या गजबजलेल्या परिसरात घडली. दोन तोतया पोलिसांनी ८२ वर्षीय निवृत्त व्यक्तीची फसवणूक करत दोन सोन्याच्या अंगठ्या आणि चार हजार रुपये रोख असा सुमारे १ लाख ५१ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.
बजाजनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माधव श्रीकृष्ण पांडे (८२) हे भाजीपाला खरेदी करून दुचाकीने घरी परतत होते. दुपारी सुमारास पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या सुरक्षा भिंतीजवळ, लक्ष्मी केशव अपार्टमेंटसमोर दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना अडवले. दोघेही दुचाकीवरून आले होते. आरोपींनी स्वतःची पोलिस म्हणून ओळख करून देत परिसरात अलीकडे चोरीच्या अनेक घटना घडल्याचे पांडे यांना सांगितले. प्रवास करताना अंगावर सोन्याचे दागिने घालू नका, असे सांगून त्यांनी पांडे यांना हातातील सोन्याच्या अंगठ्या काढण्यास सांगितले. पोलिस असल्याचा विश्वास बसल्याने पांडे यांनी दोन्ही सोन्याच्या अंगठ्या तसेच जवळील चार हजार रुपये आरोपींच्या स्वाधीन केले. आरोपींनी हा ऐवज रुमालात ठेवून त्याची पुडी बांधली आणि ती पांडे यांच्याकडे परत दिली. ही पुडी सुरक्षित ठेवण्यास सांगितले. त्यानंतर पांडे यांनी रुमालाची पुडी भाजीच्या पिशवीत ठेवली आणि ते घराच्या दिशेने रवाना झाले. घरी पोहोचल्यानंतर त्यांनी पुडी उघडली असता त्यातील दोन्ही सोन्याच्या अंगठ्या आणि चार हजार रुपये गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
चोरीला गेलेल्या ऐवजाची किंमत सुमारे १ लाख ५१ हजार रुपये आहे. याप्रकरणी पांडे यांच्या तक्रारीवरून बजाजनगर पोलिसांनी ४० ते ४५ वर्षे वयोगटातील दोन अनोळखी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून आरोपींची ओळख पटविण्याचे तसेच त्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत.