जपतलाई आश्रमशाळेची मान्यता अखेर रद्द

अनियमिततेचा ठपका; संस्थाचालकांवरील कारवाईकडे लक्ष

    दिनांक :18-Aug-2026
Total Views |
गडचिरोली,
japtalai-ashram-school : धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याच्या गंभीर घटनेनंतर अखेर प्रशासनाने शाळेची मान्यता रद्द केली आहे. या घटनेची चौकशी करून शाळेची मान्यता रद्द करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यानुसार शाळेत अनियमितता आढळल्याचा ठपका ठेवत आज मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
 

j 
 
 
जपतलाई आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या मृत्यूच्या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. त्यानंतर प्रशासनाने चौकशी सुरू करून शाळेतील व्यवस्थापन, सुरक्षा व्यवस्था तसेच विद्यार्थ्यांच्या निवास आणि देखभालीबाबतच्या बाबींची तपासणी केली. चौकशीत आढळलेल्या अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर शाळेची मान्यता रद्द करण्यात आली आहे.
 
 
दरम्यान, संबंधित आश्रमशाळेचे मुख्याध्यापक आणि इतर कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली असून, पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. मात्र, या प्रकरणातील संस्थाचालक आणि सचिव यांच्यावर अद्याप पोलिसांकडून अटकेची कारवाई झालेली नसल्याने हा मुद्दा चर्चेत आला आहे.
 
 
ही आश्रमशाळा काँग्रेसचे माजी खासदार मारोतराव कोवासे यांच्या संस्थेची असून, काँग्रेसचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष विश्वजीत कोवासे हे संस्थेचे सचिव असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे संस्थेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई कधी होणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
 
 
तीन विद्यार्थिनींच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या व्यवस्थेतील जबाबदारी निश्चित करण्याची मागणी होत असताना, पोलिसांच्या तपासाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शाळेची मान्यता रद्द झाल्यानंतर आता संस्थाचालक व संबंधित पदाधिकाऱ्यांवर काय कारवाई होते, याकडे पालकांसह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.