रुद्राक्ष वनप्रकल्पासाठी त्वरित निधी द्या : रवी बेलुरकर

मुनगंटीवारांचा वनमंत्र्यांकडे पाठपुरावा : वणीकरांचे लक्ष

    दिनांक :18-Aug-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
वणी, 
ravi-belurkar : वणी शहराच्या पर्यावरणीय आणि पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी ठरणाèया ‘रुद्राक्ष वनप्रकल्पा’चे काम निधीअभावी रखडले आहे. प्रकल्पाचे उर्वरित काम तातडीने सुरू करून तो लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा वणी नगर परिषदेचे सदस्य रवी बेलुरकर यांनी केली आहे.
 
 
y17Aug-Belurkar
 
 
 
वणी शहरापासून सुमारे सहा ते सात किमी अंतरावर निंबाळा (रोड) परिसरातील वनविभागाच्या कक्ष क्रमांक 53 मध्ये हा प्रकल्प साकारण्यात येत आहे. महसूल व वनविभागाच्या मान्यतेनंतर प्रकल्पाला सुरुवात झाली. प्रकल्पाचे एकूण अंदाजपत्रक 14 कोटी 97 लाख रुपये असून, शासनाकडून सुरुवातीला 3 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता. या निधीतून संरक्षण भिंत, स्वच्छतागृह, कार्यालय आणि नागरिकांसाठी वॉकिंग ट्रॅक आदी प्राथमिक कामे करण्यात आली आहेत. मात्र, पुढील टप्प्यातील कामांसाठी निधी उपलब्ध न झाल्याने प्रकल्पाची गती मंदावली आहे.
 
‘रुद्राक्ष वन’ हा केवळ वृक्षलागवडीचा प्रकल्प नसून पर्यावरणपूरक आणि आकर्षक सार्वजनिक स्थळ म्हणून त्याचा विकास करण्याचे नियोजन आहे. या परिसरात रुद्राक्षाच्या झाडांसोबत विविध औषधी वनस्पती, फुलझाडे व बहुउपयोगी वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर वणीच्या हरित क्षेत्रात वाढ होण्याबरोबरच नागरिकांना निसर्गाच्या सान्निध्यात फिरण्यासाठी आणि पर्यटनासाठी एक चांगले ठिकाण उपलब्ध होऊ शकते.
 
 
प्रकल्प निधीअभावी रखडल्याची बाब लक्षात घेऊन रवी बेलुरकर यांनी ज्येष्ठ नेते तथा माजी वनमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे लेखी निवेदन सादर करून उर्वरित निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. या मागणीची दखल घेत आ. मुनगंटीवार यांनी वनमंत्री गणेश नाईक यांना पत्र पाठवून रुद्राक्ष वनप्रकल्पाच्या उर्वरित कामासाठी आवश्यक निधी मंजूर करण्याबाबत कार्यवाही करण्याची विनंती केली आहे.
 
 
वणी परिसरात औद्योगिक विकासासोबतच पर्यावरण संवर्धन आणि नागरिकांसाठी सार्वजनिक सुविधा निर्माण करण्याची गरज आहे. या पृष्ठभूमीवर रुद्राक्ष वनप्रकल्प वणीच्या पर्यावरणीय व पर्यटन विकासाला चालना देणारा ठरू शकतो. त्यामुळे निधीअभावी प्रकल्प रखडून राहणे योग्य नसून शासनाने तातडीने उर्वरित निधी मंजूर करून कामाला गती द्यावी, अशी मागणी रवी बेलुरकर यांनी केली आहे.
 
 
रुद्राक्ष वनप्रकल्प पूर्ण झाल्यास वणीच्या पर्यावरणीय सौंदर्यात निश्चितच भर पडेल. नागरिकांना निसर्गाच्या सान्निध्यात सुंदर परिसर उपलब्ध होईल. त्यामुळे शासनाने उर्वरित निधी तातडीने उपलब्ध करून देऊन प्रकल्पाचे काम वेगाने पूर्ण करावे, अशी अपेक्षा बेलुरकर यांनी व्यक्त केली.
 
 
आता आ. सुधीर मुनगंटीवार यांनी वनमंत्र्यांकडे केलेल्या पाठपुराव्यानंतर वनविभागाकडून निधी मंजुरीबाबत कोणता निर्णय घेतला जातो, याकडे वणी परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.