अनिल कांबळे,
नागपूर,
share-trading-fraud : व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून शेअर ट्रेडिंग आणि गुंतवणुकीत मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर गुन्हेगारांनी शहरातील दोघांची तब्बल १ कोटी २० लाख रुपयांनी फसवणूक केली. यात एका निवृत्त बँक कर्मचाऱ्याचे ७५.२१ लाख रुपये, तर खासगी कंपनीतील कर्मचाऱ्याचे ४४.९७ लाख रुपये बुडाले आहेत. आरोपींनी परताव्याचे आश्वासन दिले; मात्र पैसे गुंतवल्यानंतर संपर्क तोडून रक्कम परत करण्यास नकार दिला.

मनीषनगर येथील संजय देवराव चंदनखेडे (६५) हे निवृत्त बँक कर्मचारी आहेत. त्यांना व्हॉट्सॲपवर ‘६६१८८ इलाईट ग्रोथ फार्म’ नावाची लिंक पाठविण्यात आली. १२ जून ते १४ ऑगस्टदरम्यान त्यांना सुमारे १३५ सदस्य असलेल्या एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सहभागी करण्यात आले. या ग्रुपमध्ये शेअर ट्रेडिंग आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविण्यात आले. आरोपींच्या सांगण्यावर विश्वास ठेवून चंदनखेडे यांनी पत्नीसमवेत असलेल्या संयुक्त बँक खात्यातून वेगवेगळ्या व्यवहारांद्वारे पैसे पाठविण्यास सुरुवात केली. त्यांची एकूण गुंतवणूक ७५ लाख २१ हजार रुपयांवर पोहोचली. मात्र, आश्वासन दिल्याप्रमाणे नफा मिळाला नाही. त्यानंतर चंदनखेडे यांनी गुंतवलेली रक्कम परत मागितली. आरोपींनी नफा तर दिलाच नाही, शिवाय मूळ रक्कमही परत केली नाही. अखेर त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
तरुणाची ४५ लाखांची फसवणूक
नंदनवन येथील खासगी कंपनीतील कर्मचारी हर्षल बंडू महंत (३४) यांची ४४ लाख ९७ हजार ३९६ रुपयांची फसवणूक झाली. +४४ यूके कंट्री कोड असलेल्या मोबाइल क्रमांकावरून एका अनोळखी व्यक्तीने महंत यांच्याशी संपर्क साधला. गुंतवणुकीत रस आहे का, अशी विचारणा करून त्यांना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जोडण्यात आले. या ग्रुपमध्ये विविध गुंतवणूक योजनांची माहिती देत मोठा नफा मिळत असल्याचे भासविण्यात आले. आरोपींच्या सांगण्यावर विश्वास ठेवून महंत यांनी वेगवेगळ्या तारखांना अनेक व्यवहारांद्वारे पैसे गुंतविले. अशा प्रकारे त्यांनी जवळपास ४४.९७ लाख रुपये आरोपींना पाठविले. मात्र, आश्वासन दिलेला नफा मिळाला नाही आणि गुंतवलेली रक्कमही परत करण्यात आली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महंत यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेतली. दोन्ही प्रकरणांत भारतीय न्याय संहिता, माहिती तंत्रज्ञान कायदा तसेच फसवणुकीसंदर्भातील संबंधित कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सायबर पोलिसांकडून आर्थिक व्यवहारांचा माग काढला जात असून, फसवणुकीसाठी वापरण्यात आलेली बँक खाती आणि मोबाइल क्रमांक तपासले जात आहेत. व्हॉट्सॲप ग्रुप चालविणारे आरोपी तसेच या फसवणुकीमागील मोठ्या नेटवर्कचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.