गडचिरोली,
student-dies-of-snakebite : धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहात सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या तीन विद्यार्थिनींच्या कायदेशीर वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपये आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. तिन्ही विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांसाठी एकूण १५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, याबाबत मुख्यमंत्री सचिवालयाने जिल्हाधिकारी, गडचिरोली यांना कळविले आहे.
जपतलई येथील आश्रमशाळेच्या वसतिगृहात १० ऑगस्ट रोजी सर्पदंशाची घटना घडली होती. या दुर्घटनेत दीपिका एकता लकडा, अनु गुजाम कोरेटी आणि सुष्मिता सरोजित मंडल या तीन विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती.
दरम्यान, दुर्घटनेतील मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची शासकीय मदत यापूर्वीच मंजूर करण्यात आली आहे. त्याव्यतिरिक्त आता मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपये मंजूर करण्यात आल्याने तिन्ही कुटुंबांना अतिरिक्त आर्थिक आधार मिळणार आहे.
मुख्यमंत्री सहायता निधीतून मंजूर झालेली १५ लाख रुपयांची रक्कम जिल्हाधिकारी, गडचिरोली यांच्या संबंधित बँक खात्यात वर्ग करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सचिवालयाच्या निर्देशानुसार मृत विद्यार्थिनींच्या कायदेशीर वारसांची आवश्यक पडताळणी करून त्यांना ही मदत वितरित करण्यात येणार आहे.
मंजूर निधीचा विहित प्रयोजनासाठी विनियोग झाल्यानंतर त्याबाबतचे प्रमाणपत्र मुख्यमंत्री सचिवालयास सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.