‘कर्जात बुडालो होतो, तरी आनंदी होतो’

सनी देओलने सांगितला ५६ कोटींच्या कर्जाचा काळ

    दिनांक :18-Aug-2026
Total Views |
sunny deol reveals अभिनेता सनी देओलचा ‘बंटवारा 1947’ हा चित्रपट सध्या थिएटरमध्ये प्रदर्शित असून त्याला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान नुकत्याच झालेल्या एका पॉडकास्ट मुलाखतीत सनी देओलने त्याच्या करिअरमधील अत्यंत कठीण टप्प्याविषयी मनमोकळेपणाने भाष्य केलं. काही चित्रपटांच्या निर्मितीमुळे त्याच्यावर तब्बल ५६ कोटी रुपयांचं कर्ज झालं होतं. परिस्थिती इतकी बिकट झाली होती की, बँकेने त्याच्या संपत्तीच्या लिलावाची नोटीसही जारी केली होती. मात्र, या कठीण काळातही आपण आनंदी होतो आणि आपल्या मनाप्रमाणे आयुष्य जगत होतो, असं सनीने सांगितलं.
 

sunny deol reveals rs 56 crore debt phase: “i was still happy” 
बँकेकडून संपत्तीच्या लिलावाची नोटीस
२०२३ मध्ये ‘गदर 2’ या ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर लगेचच एका बँकेने सनी देओलच्या जुहू येथील व्हिलासाठी ई-लिलावाची नोटीस जारी केली होती. ५५.९९ कोटी रुपयांच्या व्याजाच्या थकबाकीमुळे ही नोटीस काढण्यात आली होती. मात्र, सनीने थकबाकीची रक्कम भरण्यास सहमती दर्शवल्यानंतर बँकेने ही नोटीस मागे घेतली.
शुभंकर मिश्र यांच्या पॉडकास्टमध्ये या काळाविषयी बोलताना सनी देओल म्हणाला की, तो केवळ पैशांसाठी अनेक गोष्टी करू शकत नाही. कर्जात बुडालेला असतानाही आपण आनंदी होतो, कारण आपण आपलं आयुष्य आपल्या मनाप्रमाणे जगत होतो, असं त्याने स्पष्ट केलं.
आपल्याला परतफेड करायची असलेली रक्कम पूर्णपणे आपलीच होती, असंही सनीने स्पष्ट केलं. त्याने कोणाकडूनही कर्ज घेतले नव्हते किंवा कोणाचं देणंही बाकी नव्हतं. आपल्याला केवळ आपली प्रॉपर्टी विकून पैसे परत करायचे होते, असं त्याने सांगितलं.
 
 
चित्रपटांच्या निर्मितीमुळे वाढलं कर्ज
सनी देओलवर कर्जाचा डोंगर उभा राहण्यामागे त्याच्या काही चित्रपटांची निर्मिती कारणीभूत ठरली. १९९९ मध्ये त्याने ‘दिल्लगी’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. या चित्रपटात त्याचा धाकटा भाऊ बॉबी देओलनेही भूमिका साकारली होती. त्यानंतर २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘घायल रिटर्न्स’चं दिग्दर्शन सनीने केलं आणि त्यात अभिनयही केला. २०१९ मध्ये त्याचा मुलगा करण देओलने ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटाची निर्मितीही सनी देओलने केली होती. हे तिन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळवू शकले नाहीत. परिणामी सनीसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आणि त्याच्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज जमा झालं.
 
 
‘योग्य विषय आणि निर्माते मिळत नव्हते’
२०००च्या दशकाच्या सुरुवातीला योग्य विषय आणि निर्माते शोधताना आपल्याला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला, असंही सनी देओलने मुलाखतीत सांगितलं. ‘गदर’सोबतच आपण ‘इंडियन’ हा चित्रपटही दिला होता आणि तो ‘लगान’सह त्या काळातील अनेक चित्रपटांपेक्षा मोठा हिट ठरला होता, असा दावा त्याने केला. ‘इंडियन’ने ‘लगान’पेक्षा दोन ते तीन पट अधिक कमाई केली होती, असंही सनीने नमूद केलं.
मात्र, या यशानंतर कॉर्पोरेट स्टुडिओ आणि चित्रपट निर्मितीच्या पद्धतीत झालेल्या बदलांमुळे आपल्याला दिशा बदलावी लागली. त्यानंतर आपल्याला योग्य विषय आणि निर्माते का मिळत नव्हते, हे मात्र आजही कळत नसल्याचं सनी देओलने या मुलाखतीत सांगितलं.