‘जिजाऊं’नी आणले खासदार-आमदारांना एकत्र

*आर्वीत नव्या राजकीय समीकरणांची चर्चा

    दिनांक :18-Aug-2026
Total Views |
आर्वी, 
arvi-news : आर्वी विधानसभा मतदार संघ कायम चर्चेत असतो. गेल्या तीन महिन्यांपासुन राजकीयदृष्ट्या शांत असलेल्या आर्वीत मात्र स्वातंत्र्यदिनी पुन्हा एक धकातंत्र पहायला मिळाले. ३०० खाटांच्या रुग्णालयाचे चॉकलेट देत असल्याचे जाहीरसभेत बोलणारे खासदार अमर काळे यांना रुग्णालय प्रत्यक्षात दिसले. कदाचित त्याचाच परिणाम की काय तर आर्वी आगारात नव्याने दाखल झालेल्या ५ आधुनिक सर्व सुविधायुत ‘जिजाऊ’ बसेसच्या लोकार्पणप्रसंगी आ. सुमित वानखेडे आणि खासदार अमर काळे एकत्र आले. फीत कापताना आ. वानखेडे आणि खा. काळे यांच्या चेहर्‍यावरील ‘हास्य’ लपून राहिले नाही. गावखेड्यांना जोडणार्‍या एसटी महामंडळाच्या ‘जीजाऊ’ बसेसने आमदार आणि खासदार एकत्र आणले. त्यामुळे मात्र अनेकांच्या भुवया उंचावल्या.
 
 
 
jk
 
 
 
काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस (शप) गटाकडून निवडून आलेले खासदार अमर काळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्या भेटीतील अत्यंत दिलखुलास आणि हास्यमुद्रेतील फोटो समाजमाध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला. त्या ‘भेटी’चा आनंद ओसरत नाही तोच आर्वीत आ. वानखेडे आणि खा. काळे एकाच मंचावर फित कापताना प्रसन्न मुद्रेत दिसल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. आ. वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली व प्रयत्नांनी झालेल्या या विकासकामात खासदारांची ही ‘सकारात्मक’ उपस्थिती आर्वीच्या भावी राजकारणाची नांदी तर नाही ना? असा सवाल आता स्थानिक नागरिक विचारू लागले आहेत.
 
 
खासदार काळे यांची दिल्लीतील पंतप्रधान मोदींसोबतची भेट आणि आता आर्वीत आमदार वानखेडे यांच्यासोबतचा हा सलोखा या घटनांचे धागेदोरे जोडल्या जात आहेत. खासदारांचे एनडीएशी जवळीक साधण्याचे अप्रत्यक्ष संकेत तर देत नाहीत ना? अशी चर्चा आता रंगू लागली आहे.
 
 
या सर्व प्रकारामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शप गट) यांच्या स्थानिक गोटात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. आमदार सुमित वानखेडे यांच्या प्रयत्नांचे कौतुक करत त्यांच्याच सोहळ्यात हजेरी लावण्यामागे नकी कोणता राजकीय हेतू आहे? असा प्रश्न महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांना सतावत असून आर्वीच्या राजकीय पटलावर नवीन गणित तर मांडल्या जात नाही ना असा प्रश्नही उपस्थित केल्या जात आहे. आ. वानखेडे जाहीर कोणाच्याही टीकेला उत्तर देत नाहीत. पण, कृतीतून ते सहज उत्तर देऊन मोकळे होतात.