नवी दिल्ली,
bjps new strategy उत्तर प्रदेश, पंजाब आणि गुजरातमधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे फेरबदल केले आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी मंगळवारी या तीन राज्यांसाठी नव्या प्रभारींच्या नियुक्त्या जाहीर केल्या. या निर्णयामुळे आगामी निवडणुकांसाठी भाजपने तयारीला वेग दिल्याचे मानले जात आहे. उत्तर प्रदेशची जबाबदारी महाराष्ट्रातील भाजपचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्यांच्यासोबत जगदीश ईश्वरभाई पटेल यांची सह-प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशसारख्या महत्त्वाच्या राज्यात संघटन मजबूत करण्यासोबतच निवडणूक रणनीतीची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी नव्या टीमवर असेल.

पंजाबमध्ये सतीश पुनिया यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर गुजरातची जबाबदारी तरुण चुघ यांच्याकडे देण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या नियुक्त्यांकडे भाजपच्या निवडणूकपूर्व संघटनात्मक तयारीचा महत्त्वाचा भाग म्हणून पाहिले जात आहे. दरम्यान, भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांनी यापूर्वीच पक्षाच्या नव्या राष्ट्रीय टीमची घोषणा केली आहे. या संघटनात्मक बदलांमध्ये काही जुन्या नेत्यांना पुन्हा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत, तर काही पदांवर नव्या चेहऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विविध राज्यांमध्ये पक्षाचा विस्तार आणि संघटन अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने हे बदल करण्यात आल्याचे दिसून येते.
भाजपच्या या फेरबदलांमध्ये आयटी सेल आणि युवा मोर्चातील महत्त्वाच्या नियुक्त्यांचाही समावेश आहे. अमित मालवीय यांच्याकडून आयटी सेल प्रमुखपदाची जबाबदारी काढून दीपक म्हस्के यांच्याकडे आयटी आणि सोशल मीडिया विभाग सोपवण्यात आला आहे. तसेच भाजप युवा शाखेच्या अध्यक्षपदावरून तेजस्वी सूर्या यांना हटवून हेमांग जोशी यांच्याकडे भारतीय जनता युवा मोर्चाची जबाबदारी देण्यात आली आहे. माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती करून त्यांना पक्षाच्या संघटनात्मक रचनेत पुन्हा महत्त्वाची भूमिका देण्यात आली आहे. त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांचाही भाजपच्या राष्ट्रीय संघटनात्मक रचनेत पुन्हा समावेश करण्यात आला आहे. या सर्व बदलांच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश, पंजाब आणि गुजरातमधील आगामी निवडणुकांसाठी भाजपने संघटनात्मक पातळीवर तयारी अधिक मजबूत करण्यास सुरुवात केली आहे